धडधडत्या स्टेनगनला सामोरं जातं त्यांनी कसाबला जिवंत पकडलं अन् २६/११ च्या मागचा खरा चेहरा सापडला….

थोडक्यात
  • अश्यात मुंबईला दुसरा धक्का बसला. मुंबईची जगभर ओळख निर्माण करणाऱ्या ताज हॉटेलमध्ये मोठा धमाका झाला. ताजमध्ये काही दहशदवाद्यांनी शिरून तिथल्या नागरिकांना आपलं लक्ष बनवलं आणि त्यांच्यावर बेछुट गोळीबार सुरू केला. यामध्ये निरपराध नागरिक,परदेशी पर्यटक आणि हॉटेलमधील स्टाफसह एकतीसजणांचा मृत्यू झाला.

२६/११ च्या घटनेला आज १४ वर्ष पूर्ण झाली. तो दिवस आठवला तरी अंगावर शहारा उभा राहतो. मुंबईसह संपूर्ण जगाला हादरवणारी ही घटना आजही मुंबईकरांसाठी एक भळभळती जखम आहे. अनेक आयांनी या घटनेमुळे आपली पोटची पोरं गमावलेत. अनेक पत्नींनी आपलं शुभ्र लाल कुंकू, भडक रक्तात माखलेलं पाहिलंय. अनेक चिमुकल्यांनी ऐन उमेदीत आपल्या वडिलांच्या मृतदेहाला मुखाग्नी दिलाय. हि घटना जशी आठवते,तसे अंगावर शहारे उभे करते.

ही घटना घडली तेव्हा रात्रीचे जवळपास आठ वाजले होते. नेहमीप्रमाणे कामावरून सुटलेल्या चाकरमान्यांची सीएसएमटीवरची गर्दी घर गाठण्याच्या धावपळीत होती. प्लॅटफॉर्मवर मिनिटा-मिनिटांना लोकल भरगच्च होऊन मार्गस्थ होत होती. अश्यात गेट-वे-ऑफ इंडियामार्गे सीएसएमटी स्टेशनवर दोन-तीन जणांचं टोळकं हातात लोडेड-गन घेऊन आलं आणि नजर जाईल त्या ठिकाणी वेडी-वाकडी फायरिंग करू लागलं.

बघता-बघता होत्याचं नव्हतं झालं आणि माणसांना काही कळायच्या आतचं मृतदेहांचे खच सीएसएमटी स्थानकावर पडायला सुरूवात झाली. माणसं सैर-वैर पळायला लागली. किंचाळ्या,आरोळ्यांनी सगळा माहोल भयथीत करून टाकला. पोलीस यंत्रणांना नेमकं काय घडतंय हेच क्षणभर कळालं नाही. अश्यात पोलीस कंट्रोल रूमचे फोन धडधडायला लागले. सीएसएमटी स्थानकावर बेछुट गोळीबार होत होता. याची माहिती कंट्रोल रूमपर्यंत पोहचली. कंट्रोल रूमने सर्व पोलीस अधिकाऱ्यांपर्यत यासंबंधीच्या सुचना पोहचवल्या अधिकारी तातडीने अॅक्शन मोडमध्ये आले. त्यांनी पुरेश्या पोलीस बळासह सीएसएमटी स्थानकाकडे धाव घेतली. जवळपास अर्धा तासच्या सततच्या फाररिंगमुळे स्थानकावर आता नीरव शांतता पसरली होती. स्थानकावर निरपराध नागरिकांच्या मृतदेहातून रक्तांच्या नद्या वाहत होत्या.

अश्यात मुंबईला दुसरा धक्का बसला. मुंबईची जगभर ओळख निर्माण करणाऱ्या ताज हॉटेलमध्ये मोठा धमाका झाला. ताजमध्ये काही दहशदवाद्यांनी शिरून तिथल्या नागरिकांना आपलं लक्ष बनवलं आणि त्यांच्यावर बेछुट गोळीबार सुरू केला. यामध्ये निरपराध नागरिक,परदेशी पर्यटक आणि हॉटेलमधील स्टाफसह एकतीसजणांचा मृत्यू झाला.यानंतर तिथेच काही दहशदवाद्यांनी तळ ठोकला होता. पोलीस कंट्रोल रूमला याचीही तातडीने माहिती मिळाली आणि पोलीसांचे धाबे दणाणले .ही रात्र मुंबईसाठी काळरात्र ठरणार आहे,याची जाणीव पोलीसांना झाली होती.

सगळे अधिकारी या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी निखराचे प्रयत्न करत होते. तोच तिसरा धक्का मुंबईला बसला. हॉटेल ओबेरॉयला दहशदवाद्यांनी आपल्या ताब्यात घेतलं आणि तिथेही त्यांनी मोठी जिवीतहानी केली. सगळी परिस्थिती मुंबई पोलीसांच्या हाताबाहेर जात होती. तोच आणखी एक बातमी आली. अतिरेक्यांनी एक टॅक्सी बॉम्बने उडवली. या हाताबाहेर जाणाऱ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तत्कालिन सरकारने केंद्राकडे मदत मागितली आणि रॅपिड अॅक्शन फोर्स, मरिन कमांडो आणि नॅशनल सिक्युरिटी गार्ड यांना पाचारण करण्यात आलं.

तोच दुसरीकडे सीएसएमटी स्थानकावर बेछूट गोळीबार करणाऱ्या अतिरेक्यांनी कामा रूग्णालयाकडे आपला मोर्चा वळवला.तिथेही अनेकांना त्यांना आपल्या गोळीचं लक्ष बनवलं. सर्व पोलीस कर्मचारी मुंबईला वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरून सर्व परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा शर्तीने प्रयत्न करत होते. यावेळी पोलीसांसमोर खुप प्रश्न होते. किती अतिरेकी आहेत? कुठे-कुठे ते लपले आहेत? त्यांनी कोण-कोणत्या ठिकाणांना लक्ष बनवलं आहे? असे एक ना अनेक प्रश्न पोलिसांसमोर होते.

दुर्देवी म्हणजे, निष्पाप नागरिक या दहशदवादी हल्ल्यामध्ये विनाकारण मृत्यूमुखी पडत होते. अनेक पोलिसांनी अतिरेक्यांना पकडण्यासाठी आपल्या जीवाची बाजी देखील लावली होती.अतिरेक्यांच्या हमल्यात,गोळीबारात अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी,कर्मचारी शहीद होत होते. जवळपास ६० तास मुंबई पोलीस आणि अतिरेक्यांमध्ये चकमक सुरू होती. अतिरेक्यांच्या हालचालींचा अंदाज लावत मुंबई पोलीस त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते.

अश्यात अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कामटे,ए. टी. एस. चीफ हेमंत करकरे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय साळसकर,लष्करी अधिकारी संदिप उन्नीकृष्णन् यांना वीरमरण आल्याच्या बातम्यांनी देश हळहळून गेला होता. याच दरम्यान दहा दहशदवादी असल्याची माहिती मुंबई पोलीसांना लागली आणि त्यांनी एक-एकाला पकडायला सुरूवात केली. दरम्यान मुंबई पोलीस आणि अतिरेक्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीमुळे दहशदवाद्यांना मुंबई पोलीसांनी कंठस्नान घालून ढेर केलं.

दुसरीकडे दहा दहशतवाद्यांपैकी एका दहशतवाद्याला जिंवत पकडण्यात पोलिसांना यश आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम ओंबळे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता धडधडत्या स्टेनगनमधून निघणाऱ्या गोळ्या आपल्या अंगावर झेलून अजमल आमीर कसाब या दहशदवाद्याला जिवंत पकडलं.परंतु तुकाराम ओंबळे सारखे जाबाज पोलीस सहकारी शहीद झाले.तुकाराम ओंबळे यांनी दाखवलेल्या शौर्यामुळे अजमल कसाबला जिवंत पकडण्यात आलं आणि त्यामुळेच आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आला.

आपल्या अफाट शौर्याने आपल्या वीर पोलिसांनी,वीर जवानांनी आपली मुंबई पाकिस्तानच्या नापाक हरकतीमधून वाचवली आणि आपल्या मुंबईला खऱ्या अर्थाने संकटमुक्त केलं.अशी घटना मुंबईसह देशात कुठेच घडू नये हीच प्रार्थना.

समाधान जाधव

कु.समाधान जाधव चालू घडामोडी तसंच विविध विषयांवर आपल्या लेखनीच्या माध्यमातून प्रखरपणे भाष्य करणारे पत्रकार. समाधान यांनी महाराष्ट्रातील नावाजलेल्या वृत्तवाहिनीसोबत प्रदीर्घ काळ काम केले आहे. तसंच महाराष्ट्रभरात विविध विषयांवर जवळपास दिडशेहून अधिक व्याख्याने देखील सांगितली आहेत.
Back to top button

You cannot copy content of this page