महाराष्ट्राचा मान आणि शान असलेल्या रांगड्या सह्याद्रीचा जन्म कसा झाला? ठाऊक आहे?

थोडक्यात
  • काही शतकांपूर्वी मोघलांनी केलेला तोफांचा मारा आणि आजवर होणारा ऊन, वारा, पाऊस झेलत हा सह्याद्री इतिहासातील शौर्याच्या खुणा दाखवत ताठमानेने उभा आहे. या पोलादी छातीच्या सह्याद्रीची निर्मिती कशी झाली हे आज आपण जाणून घेऊयात.

राकट देशा, कणखर देशा,दगडाच्या देशा
नाजूक देशा ,कोमल देशा, फुलांच्याही देशा,
प्रणाम माझा घ्यावा हा श्री महाराष्ट्र देशा…

मराठी मातीचा, मराठी माणसांचा अभिमान आणि शान म्हणजे रांगडा सह्याद्री पर्वत. या सह्याद्रीने शिवरायांचा पराक्रमी इतिहास पाहिला, जिजाऊंची शिकवण दिली. शंभू राजेंसारखा पराक्रमी योद्धा दिला. तसंच मराठ्यांचा पराक्रम आणि मोघलांची झालेली हार या चित्तथरारक इतिहासाचा सह्याद्री साक्षीदार ठरला.

काही शतकांपूर्वी मोघलांनी केलेला तोफांचा मारा आणि आजवर होणारा ऊन, वारा, पाऊस झेलत हा सह्याद्री इतिहासातील शौर्याच्या खुणा दाखवत ताठमानेने उभा आहे. या पोलादी छातीच्या सह्याद्रीची निर्मिती कशी झाली हे आज आपण जाणून घेऊयात.

महाराष्ट्राच्या अभेद्य सह्याद्री पर्वतरांगा या मुख्यतः भारताच्या पश्चिम समुद्रकिनाऱ्या शेजारील पर्वतरांगा आहेत. या पर्वतरांगांची लांबी सरासरी १६०० किलोमीटर असून तापी नदीच्या दक्षिण भागाकडून व महाराष्ट्र- गुजरातच्या सीमालगत भागाकडून या पर्वतरांगा सुरू होतात. या पर्वतरांगा महाराष्ट्रातील ४४० किलोमीटरचे अंतर पार करून गोवा,कर्नाटक,तामिळनाडू आणि केरळ राज्यातून प्रवास करत भारताच्या दक्षिण टोकाला येऊन संपतात.

गोंडवन खंडाच्या तुकड्यातून वेगळी झालेली भारत उपखंडाची जमीन ही सरकत सरकत युरेशियन उपखंडाला जाऊन मिळाली, तेथे तयार झालेल्या ज्वालामुखीमुळे मोठया प्रमाणात लाव्हा तयार झाल्या. या लाव्हा सहा कोटींपेक्षा जास्त वर्षांपूर्वी थंड होऊन तिथे एक पठाररांग तयार झाली व त्या पठाररांगेस दख्खनचे पठार असे संबोधले गेले.हे पठार म्हणजेच सह्याद्री पर्वतरांग.

भूगर्भशास्त्रज्ञानांच्या अभ्यासानुसार, येथे तयार झालेल्या लाव्हांमुळे बेसाल्ट खडकाची निर्मिती झाली. त्यामुळे सह्याद्री पर्वत रांगेत चार्नोकाईट, ग्रॅनाईट, खोंडालाईट, लेप्टिनाईट. लॅटराईट व बॉक्साईट या खडकांपेक्षा बेसाल्ट खडकाचे प्रमाण सर्वात जास्त आहे.

शिवरायांच्या स्वराज्याच्या ध्यासाने झपाटलेल्या सह्याद्रीनेसुद्धा या रयतेच्या राजाची आणि त्यांच्या मावळ्यांची साथ कधीच नाही सोडली.
सह्याद्री पर्वतरांगा व आजूबाजूचा परिसर हा पहाडी जंगल, जीवघेण्या दऱ्याखोऱ्यांनी वेढलेला आहे.
त्यामुळे रयतेचा राजा आणि येथील मावळ्यांच्या धाडसी पराक्रमामुळे एकही बादशाह सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये जिंकूच शकला नाही.

सह्याद्रीच्या उत्तरेस असलेल्या भागांना सातपुड्याच्या पर्वतरांगा असे म्हणतात. माथेरान, महाबळेश्वर, पाचगणी हे रांगड्या सह्याद्रीतील थंड हवेची ठिकाणं म्हणून ओळखली जातात.

महाराष्ट्रात ज्या प्रमुख नद्या आहेत. या नद्यांवर आधारित राहून इथले शेतकरी शेती हा व्ययसाय करतात. त्या नद्यांचे उगमस्थान हे सह्याद्रीच्या कुशीतच आहे. पश्चिम घाटामुळे मोसमी वारे अडले जातात शिवाय येथील असलेले घनदाट जंगले मुबलक पाऊस होण्यास कारणीभूत ठरतात.त्यामुळे येथील नद्यांना बारमाही मुबलक प्रमाणात पाणी असते.

सह्याद्रीच्या पर्वतरांगा ह्या बलाढ्य, पोलादी छातीच्या अक्राळविक्राळ असल्या तरी येथील निसर्गसौंदर्य डोळ्याचे पारणे फिरणारे असते. सह्याद्रीच्या सौंदर्याचे वर्णन करताना तेथील पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेला कोकण विभाग हे सह्याद्रीच्या निसर्ग सौंदर्यात अजूनच भर घालतो.

कळसुबाई शिखर,हरिश्चंद्र गड, पालघाट खिंड हे सह्याद्रीच्या ताठ कण्याची साक्ष देतात. शिवरायांच्या पराक्रमी इतिहासाचा वारसा जपणाऱ्या आणि आपल्या रांगड्या सौंदर्याने प्रत्येक मानामनाला भुरळ पडणाऱ्या या सह्याद्रीला रांगड्या मनाचा मानाचा मुजरा…

आचार्य नीती

राजकीय, सामाजिक, साहित्यिक आणि अभ्यासपूर्ण माहितीसाठी आचार्य नीती हे सांकेतिकस्थळ सुरु करण्यात आलं आहे. महाराष्ट्रासह देशभरातील विविध घटना,ताज्या घडामोडी यांचे सखोल विश्लेषण तुम्हाला या सांकेतिक स्थळावर वाचायला मिळेल. यामाध्यमातून आम्ही सातत्यापूर्ण आपल्यापर्यंत विश्वासनीय आणि वैचारिक माहिती पोहचवत राहू.आमच्यासोबत जोडले जा आणि अभ्यासपुर्ण माहिती वाचत राहा.
Back to top button

You cannot copy content of this page