गांधीजींनी पुकारलेल्या मीठाच्या सत्याग्रहात नवी मुंबई अग्रेसर होती,वाचा सविस्तर कहाणी

थोडक्यात
  • ब्रिटिशांनी मिठावर अवास्तव व अन्यायकारक कर लावला आणि देशभर संतापाची लाट उसळली.इंग्रजांच्या या निर्णयाविरोधात जाऊन महात्मा गांधी यांनी मिठावरील कर न भरण्याचं आवाहन भारतीयांना केलं.याचसोबत गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहाची घोषणा केली. यानंतर देशभर मीठाच्या सत्याग्रहासाठी छावण्या उभारण्यात आल्या.

तीसाव्या दशकात देशभर स्वातंत्र भारतासाठी क्रांतीचे वारे वाहू लागले होते.याचं लोण ठाण्यानजदीगच्या बेलापूर पट्टीपर्यंत येवून पोहचलं होतं.ठिकठिकाणी देशभक्तांच्या फळ्या उभ्या राहत होत्या.त्यातच अनेक क्रांतीकारकांच्या बलिदानाने भारतीयांमध्ये ब्रिटिशांविरोधच्या असंतोषाची आग धगधगत होती.अश्यात ब्रिटिशांनी मिठावर अवास्तव व अन्यायकारक कर लावला आणि देशभर संतापाची लाट उसळली.

इंग्रजांच्या या निर्णयाविरोधात जाऊन महात्मा गांधी यांनी मिठावरील कर न भरण्याचं आवाहन भारतीयांना केलं.याचसोबत गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहाची घोषणा केली. यानंतर देशभर मीठाच्या सत्याग्रहासाठी छावण्या उभारण्यात आल्या.या छावण्यामधून देशभक्त तरूणांना इंग्रजांविरूद्धच्या कारवायांबाबतचे मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाऊ लागले.यातच बेलापूर पटीतल्या साष्टी तालुक्यामध्येही या सत्याग्रहाचे पेव फुटले आणि घणसोली गावात सत्याग्रही छावणी उभारण्यात आली.

या छावणीची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी माधवराव काळदाते, आचार्य रबडे, ना.म.जोशी, गणपतराव फडके, दत्ताजी ताम्हाणे, गोपाळराव पाटील, कावेरीताई पाटील,चाहू आंबो पाटील, रामा दिवड्या रानकर, शंकर शनिवार पाटील या तरूणांकडे देण्यात आली.अटक झाल्यानंतर काय करायचं,जखमी झाल्यास काय करायचं, सत्याग्रहाचे स्वरूप काय?, सत्याग्रह कसा करावा, त्याचा उद्देश काय? हे सारं काही या छावण्यांमध्ये शिकवण्यात येऊ लागलं.

या छावण्यांच्या माध्यमातून या सत्याग्रहाविषयी जनजागृती करण्यासाठी आजूबाजूच्या गावात प्रभातफेऱ्या काढल्या जाऊ लागल्या.या प्रभातफेऱ्यांच्या माध्यमातून मिठांवरील जुलमी कर भरू नका,शांतताभंग न करता कायदेभंग करा,असे आवाहन केले जाऊ लागले.हळूहळू याची कल्पना पोलिसांना येऊ लागली आणि पोलिसांनी घणसोलीमध्ये आपला तळ ठोकला.

यानंतर सत्याग्रहींनी शिरवणे,बेलापूर येथे छावण्या उभारल्या आणि इथूनच पुढचा कारभार सुरू केला.दरम्यान १४ मार्च १९३० रोजी घणसोलीतील छावणीत पोलिसांच्या नाकावर टिचून गुप्त बैठक पार पडली.या बैठकीत दिवेगावच्या खाडीवर मोठ्या संख्येने मिठाचा सत्याग्रह करण्याचा निर्णय झाला.या बैठकीत सर्वांना जबाबदाऱ्याही वाटून देण्यात आल्या.

बघता-बघता सत्याग्रहाचा दिवस उजाडला. चाहू आंबो पाटील, रामा दिवड्या रानकर, शंकर शनिवार पाटील, नारायण मरोजी मढवी, वाल्मिकी महादू पाटील यांनी पहिल्यांदा मार्चा सांभाळत दिवे खाडीच्या दिशेने धाव घेतली. त्यांच्या पाठोपाठ अनेक देशभक्त तरूण पुढे आले.भारत माता की जय,महात्मा गांधी की जय अश्या घोषणा देत या सत्याग्रहाला सुरूवात झाली. यावेळी कुणी आपल्या ओंजळीने मीठ उचलले. तर कुणी आपल्या मुठीमध्ये मीठ उचलले.कुणी सोबत आणलेल्या पिशवीत मीठ भरले.तर कुणी सोबत आणलेल्या पोत्यात मीठ भरू लागले.यावेळी देशासाठी क्रांतीकारी चळवळीमध्ये सहभागी झालेल्या तरूणांच्या चेहऱ्यावर वीरश्री भाव उमटले होते.दिवे खाडीचा परिसर देशभक्तीच्या भावनेने भारावून गेला होता.

दरम्यान सत्याग्रह करण्याचा प्रयत्न यशस्वी झाल्याचं पाहून प्रत्येक जण विजयी मुद्रेने परतीच्या प्रवासाला लागला. तोच गोठिवली गावाबाहेर इंग्रज शिपायांनी या सत्याग्रहींचा रस्ता आडवला आणि हातातील मीठ खाली टाका असा सज्जड दम दिला. तेव्हा संतप्त झालेल्या या सत्याग्रही तरूणांनी भारतमाता की जय या घोषणा द्यायला सुरूवात केली.तेव्हा इंग्रज शिपायांनी या सत्याग्रहींवर अमानुषपणे लाठीमार केला.यामध्ये जवळपास पन्नास सत्याग्रही जखमी झाले.या लाठीमाराने हे आंदोलन दडपले जाईल असा इंग्रजांचा कयास होता.पण झाले उलटेच. सत्याग्रही आणखी त्वेषाने पेटून उठले.तत्कालिन दैनिक वृत्तपत्रांनी या घटनेची दखल घेतली आणि बेलापूर पट्टीत हे आंदोलन आणखीनच चिघळले. यानंतर २३ एप्रिल १९३० रोजी सारसोळे येथील सोनखार या मिठागरात आधी पेक्षा मोठा सत्याग्रह झाला. ज्यामध्ये ५०० हून अधिक लोकांनी सहभाग नोंदवला.अखेर देशभर विविध ठिकाणी असे सत्याग्रह होऊ लागले आणि अखेर या सत्याग्रहाने धास्तावलेल्या ब्रिटिश सरकारने मिठावरील जाचक कर संपुर्णत: काढून टाकले.दरम्यान या चळवळीमुळे बेलापूर पट्टीतील अनेक तरूणांमध्ये देशभक्तीची भावना दृढ झाली. हि भावना आजही त्यांची पिढी स्वातंत्र भारतात सन्मानाने जोपासतेय.

आचार्य नीती

राजकीय, सामाजिक, साहित्यिक आणि अभ्यासपूर्ण माहितीसाठी आचार्य नीती हे सांकेतिकस्थळ सुरु करण्यात आलं आहे. महाराष्ट्रासह देशभरातील विविध घटना,ताज्या घडामोडी यांचे सखोल विश्लेषण तुम्हाला या सांकेतिक स्थळावर वाचायला मिळेल. यामाध्यमातून आम्ही सातत्यापूर्ण आपल्यापर्यंत विश्वासनीय आणि वैचारिक माहिती पोहचवत राहू.आमच्यासोबत जोडले जा आणि अभ्यासपुर्ण माहिती वाचत राहा.
Back to top button

You cannot copy content of this page