शिक्षक आणि पदवीधरनंतर कसबा आणि पिंपरी-चिंचवड निवडणूकही भाजपला जाऊ शकते जड?

शिक्षक आणि पदवीधर मतदार संघात मोठ्या अपयशाला सामोरं जावं लागल्यानंतर भाजपला कसबा आणि पिंपरी-चिंचवड विधानसभेची पोट निवडणूकही जड जाणार असल्याचं चित्र सध्या पुण्यामध्ये तयार झालंय. कारण,पुण्यातील कसबा आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणूकांचं बिगूल वाजल्यानंतर मुक्ता टिळक यांच्या जागेवर भाजपाने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे चिंचवडमधून लक्ष्मण जगतापांच्या पत्नी अश्विनी जगतापांना उमेदवारी जाहीर केली आहे.

दरम्यान भाजपाने हेमंत रासने यांना दिलेल्या उमेदवारीमुळे पुण्यातील ब्राम्हण समाज आक्रमक झाला असून कसब्यात ‘कुलकर्णींचा मतदारसंघ गेला…टिळकांचा मतदारसंघ गेला..आता नंबर बापटांचा का???…समाज कुठवर सहन करणार?’ अश्या आशयाचे बॅनर झळकवण्यात आले आहेत. यातच हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे यांनी जाहिर मतप्रदर्शित करत याचा किती फटका बसेल हे येत्या २-३ तारखेला कळेल, असा प्रखर इशारा भाजपला दिला आहे.

या आधी भाजपकडून कोथरूड मधील स्थानिक माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची उमेदवारी काढून घेत ही जागा कोल्हापूरच्या चंद्रकांत पाटलांना दिली गेली. त्यावेळी ही ब्राम्हण समाज चांगलाच आक्रमक झालेला पाहायला मिळाला. याचा थेट परिणाम मतदानावरही झालेला पाहायला मिळाला. यावेळी मेधा कुलकर्णींसाठीचं १ लाखांचं मतदान थेट २० हजारांपर्यत खाली आल्याचं पाहायला मिळालं. अश्यात आता पुन्हा भाजपाने मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर त्यांच्या घरातील किंवा ब्राम्हण समाजातील उमेदवाराला उमेदवारी न देता हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्यानं ब्राम्हण समाजात कमालीची नाराजी आहे. याच पार्श्वभूमीवर ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असा सूर भाजपप्रणित सत्ताधाऱ्यांकडून आळवण्यात येत आहे. मात्र,या सूरामध्ये विरोधकांनी सूर न मिळवता वेट आणि वॉचची भूमिका कायम ठेवली आहे.

अश्यात हि निवडणूक जर बिनविरोध झाली नाही,तर याचा थेट फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे. मात्र,महाविकास आघाडीने भाजपला शह देण्यासाठी टिळक कुटुंबाची मनधरणी करून त्यांच्या कुटुंबातील सदस्याला किंवा ब्राम्हण समाजातील उमेदवारा उमेदवारी देऊ केली तर हि पोट निवडणूक भाजपाला जड जाण्याची शक्यता आहे.

आचार्य नीती

राजकीय, सामाजिक, साहित्यिक आणि अभ्यासपूर्ण माहितीसाठी आचार्य नीती हे सांकेतिकस्थळ सुरु करण्यात आलं आहे. महाराष्ट्रासह देशभरातील विविध घटना,ताज्या घडामोडी यांचे सखोल विश्लेषण तुम्हाला या सांकेतिक स्थळावर वाचायला मिळेल. यामाध्यमातून आम्ही सातत्यापूर्ण आपल्यापर्यंत विश्वासनीय आणि वैचारिक माहिती पोहचवत राहू.आमच्यासोबत जोडले जा आणि अभ्यासपुर्ण माहिती वाचत राहा.
Back to top button

You cannot copy content of this page