सानपाड्यातलं असं मंदिर जिथे स्वत: दत्त गुरूंनी भाविकांना दर्शन दिलं होतं,वाचा रंजक गोष्ट

थोडक्यात
  • खरंतर इथल्या दत्तभक्तांची सकाळ ही दत्तगुरूंच्या दर्शनानेच प्रसन्न होते.या मंदिरात दर गुरुवारी महाप्रसादाचं नियोजन केलं जातं. दरम्यान या नियोजनात अन्नदान करण्यासाठी नोंदणी करून किमान वर्षभर वाट पाहावी लागते.हे मंदिर सानपाड्यासारख्या ठिकाणी कश्याप्रकारे उभं राहिलं याची ही एक आख्यायिका आहे.ही आख्यायिका आजही इथल्या स्थानिकांकडून मोठ्या कुतुहलाने सांगितली जाते.

‘श्री गुरुसारखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी’,असं म्हणत संत तुकाराम महाराजांनी दत्तगुरूंच्या भक्तीची केलेल्या व्याख्या ही गुरुत्वाच्या अनुषंगाने फार महत्वाची ठरते.ही गुरुत्वाची व्याख्या खरी करत गेल्या कित्येक वर्षांपासून भाविकांच्या आकर्षणाचं केंद्र बनलेल्या नवी मुंबईतल्या अश्याच एका दत्त मंदिराची गोष्ट आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत.

नवी मुंबईच्या सानपाड्यात पनवेल-सायन महामार्गालगत असलेलं दत्त मंदिर हे नवी मुंबईतल्या सानपाड्यातील प्रत्येकाच्या आस्थाचा विषय बनलंय.हे मंदिर जवळपास अडीच एकरावर पसरलेलं आहे. आजूबाजूला सुंदर अश्या निसर्गाने नटलेलं आहे.या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात दत्तांच्या मूर्तीची नाही तर पादुकांची पूजा केली जाते.

खरंतर इथल्या दत्तभक्तांची सकाळ ही दत्तगुरूंच्या दर्शनानेच प्रसन्न होते.या मंदिरात दर गुरुवारी महाप्रसादाचं नियोजन केलं जातं. दरम्यान या नियोजनात अन्नदान करण्यासाठी नोंदणी करून किमान वर्षभर वाट पाहावी लागते.हे मंदिर सानपाड्यासारख्या ठिकाणी कश्याप्रकारे उभं राहिलं याची ही एक आख्यायिका आहे.ही आख्यायिका आजही इथल्या स्थानिकांकडून मोठ्या कुतुहलाने सांगितली जाते.

या आख्यायिकेनुसार, ‘ठाणे-बेलापूर पट्टीच्या पूर्वेला रायगड जिल्ह्यात तळोजाजवळ डोंगराच्या पायथ्याशी ‘ओवे’ नावाचे गाव होते. तिथे एक सदाचारी सदन शेतकरी कुटुंब आनंदात नांदत होते. हे शेतकरी कुटुंब आल्या-गेल्याचा सत्कार, गरिबांवर दया, गरजूंना मदत अशी अनेक सत्कार्य करत होते. एक दिवस अचानक एक सिद्ध योगी त्यांच्या घरी आले व त्यांना या शेतकरी दामत्यांनी दूध देऊ केले. हे योगी दूध पिऊन झाल्यावर संतुष्ट होऊन सर्वांना आशीर्वाद देऊन सानपाड्याच्या निर्जन मैदानात येऊन थांबले. येथे औदुंबराचे झाड होते व त्या झाडाखाली मोठा दगड होता. ते योगी या दगडावर बसले. तिथेच आपला दंडा व झोळी ठेवून ते ध्यान करू लागले.

या ध्यानातील योग्याचे तेज, साधना, प्रभाव व अचारण पाहून लोक प्रभावित झाले व त्यांच्या चरणी लीन होऊ लागले. यावेळी चमत्कार एक चमत्कार झाला, कितीही गर्दी झाली तरी हे योगी सर्वांपेक्षा उंचच दिसू लागले.यानंतर एकदिवस असाच आणखी एक चमत्कार घडला. ज्या औदुंबराच्या झाडाखाली ते योगी बसले होते, त्या झाडाच्या मुळा खालून निर्मळ पाण्याचा झरा वाहू लागला.

औदुंबराच्या खाली गंगाच प्रकटल्यासारखा साक्षात्कार सर्वांना झाला. ही बातमी वाऱ्यासारखे पसरली आणि बघता-बघता इथून लोकांनी भरभरून हे पाणी तीर्थ म्हणून आपल्या घरी नेले. एक दिवस एक उत्पाद घडून आला आणि यामुळे मोठा अनर्थ घडला. त्यावेळीपासून ते योगी इथे पुन्हा कधीच दिसले नाहीत व झऱ्याचेही पाणी पुन्हा कधीच कुणी पाहिले नाही. हे योगी दुसरे तिसरे कुणीही नसून साक्षात श्री दत्त महाराजचं होते.अशी आख्यायिका येथे सांगितली जाते.दरम्यान याठिकाणी आज मंदिर तयार करण्यात आले असून या मंदिरात श्री दत्त महाराजांच्या पादुकांची पुजा केली जाते.

आचार्य नीती

राजकीय, सामाजिक, साहित्यिक आणि अभ्यासपूर्ण माहितीसाठी आचार्य नीती हे सांकेतिकस्थळ सुरु करण्यात आलं आहे. महाराष्ट्रासह देशभरातील विविध घटना,ताज्या घडामोडी यांचे सखोल विश्लेषण तुम्हाला या सांकेतिक स्थळावर वाचायला मिळेल. यामाध्यमातून आम्ही सातत्यापूर्ण आपल्यापर्यंत विश्वासनीय आणि वैचारिक माहिती पोहचवत राहू.आमच्यासोबत जोडले जा आणि अभ्यासपुर्ण माहिती वाचत राहा.
Back to top button

You cannot copy content of this page