काळजावर घाव बसावा अशी बातमी आली आणि महाराष्ट्र गहिवरला….

- मातोश्री बाहेरची गर्दी झपाट्याने वाढत होती.नेते मंडळी,कलाकार आणि देशभरातील दिग्गज मंडळी मातोश्रीवर येवू लागली होती.बाळासाहेब कसे आहेत?,काय करतायेत?,कुणी काहीच का सांगेना म्हणून शिवसैनिक अक्षरश: बैचेन होत होते.
नुकताच दसरा मेळावा होऊन गेला होता. बाळासाहेब आजारी असल्याने मेळाव्याला उपस्थित राहू शकले नव्हते. त्यांनी शिवतीर्थावर उपस्थित असलेल्या लाखो शिवसैनिकांना व्हिडीओच्या माध्यमातून संबोधित केलं. या व्हिडीओत साहेबांची तब्येत फारच खालवल्याचं दिसत होतं. साहेबांचं दर्शन असं व्हिडीओच्या माध्यमातून झाल्याने शिवसैनिक बैचेन झाले होते.
हात जोडून साहेब लवकर बरे व्हा! अशी प्रार्थना करत होते. दरम्यान काही दिवस सरले आणि दिवाळीचा सण सुरू झाला. तेवढ्यात बातमी आली. बाळासाहेबांची प्रकृती खालावल्याची.हि बातमी ऐकताच शिवसैनिक धास्तावले.अक्षरश: मिळेल ती गाडी पकडून त्यांनी मातोश्रीचं अंगण जवळ केलं.
राज्यभरात बाळासाहेबांच्या आजारपणाची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि जागोजागी बाळासाहेबांसाठी पुजा-आर्चा,महाआरत्या,अभिषेक होऊ लागले. कित्येकांनी बाळासाहेब बरे व्हावेत म्हणून आपल्या घरातले देव पाण्यात ठेवले. अनेकांनी मुंबईची वाट धरली. बाळासाहेब हे फक्त शिवसैनिकांसाठीच नाही,तर प्रसंगी आपल्या इतर पक्षीय नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मदतीला धावून जाणारे नेते होते. त्यामुळे त्यांच्या आजारपणाच्या बातमीनं सगळेच चिंतेत पडले होते.
मातोश्री बाहेरची वर्दळ हळूहळू वाढू लागली होती.शिवसैनिक मातोश्री बाहेर हजारोंच्या संख्येने जमू लागले होते.शिवसैनिक उन्हातान्हात,उपाशी-तापाशी फक्त बाळासाहेबांच्या प्रकृतीबाबत सकारात्मक बातमी यावी, याची वाट पाहत होते. दुसरीकडे शिवसैनिकांचे डोळे मातोश्रीच्या त्या खिडकीकडे लागले होते,जिथून बाळासाहेब दरवेळी शिवसैनिकांना आपले हात उंचावून लढण्याचं बळ देत होते.
बाळासाहेब कधीही उठतील. खिडकीत येतील आणि आपल्याशी संवाद साधतील या एका आशेपोटी शिवसैनिक रित्यापोटी,बोचऱ्या थंडीत आणि कडक उन्हात खिडकीकडे आस लावून बसले होते.अश्यात १३ नोव्हेंबरचा दिवस उजाडला आणि नजरेसमोर साक्षात देव उभा राहावा तसा काहीसा अनुभव शिवसैनिकांना आला.कारण,शिवसैनिकांच्या डोळ्यासमोर साक्षात बाळासाहेब नावाचा देव आपले हात फेलावून आशीर्वाद देत उभा होता.डोळे भरून शिवसैनिकांनी बाळासाहेबांचं दर्शन घेतलं आणि शिवसैनिक तृप्त झाले.

दरम्यान बाळासाहेबांचं आपण हे शेवटचं दर्शन घेतोय याची पुसटशीही कल्पना शिवसैनिकांना नव्हती.पण दुसरीकडे बाळासाहेबांच्या दर्शनानं शिवसैनिकांच्या चिंतेत फार मोठी भर पडली होती. बाळासाहेब फारच अस्वस्थ दिसत होते. त्यांची तब्येत त्यांना साथ देत नसल्याचं शिवसैनिकांना दिसत होतं.
१५ नोव्हेंबरला बाळासाहेबांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने तातडीने लिलावती रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांना बोलावण्यात आलं.त्यांनी बाळासाहेबांना तपासलं आणि त्यांनी बाळासाहेबांची तब्येत फारचं खालावल्याचं वृत्त ठाकरे परिवाराला दिलं. दरम्यान डॉक्टरांची रेलचेल मातोश्रीवर वाढली आणि शिवसैनिक धास्तावले.
मातोश्री बाहेरची गर्दी झपाट्याने वाढत होती.नेते मंडळी,कलाकार आणि देशभरातील दिग्गज मंडळी मातोश्रीवर येवू लागली होती.बाळासाहेब कसे आहेत?,काय करतायेत?,कुणी काहीच का सांगेना म्हणून शिवसैनिक अक्षरश: बैचेन होत होते.
अखेर १७ नोव्हेंबरचा दिवस उजाडला.मातोश्री बाहेरच्या गर्दीनं हजारोंचा टप्पा ओलांडला आणि अश्यात काळजावर घाव बसावा अशी बातमी शिवसैनिकांच्या कानावर येवून आदळली. ‘वाघ’ गेला. या बातमीनं अवघ्या महाराष्ट्राचं काळीज पिळवटून निघालं.शिवसैनिकांच्या आसवांचा बांध फुटला. आणि छाती बडवून मर्द देहयष्ठीचा शिवसैनिक रडू लागला. मातोश्री बाहेरचा कंदील उतरवण्यात आला आणि उद्धव ठाकरेंनी स्वत:ला सावरत उपस्थितांना धीर दिला आणि शांतेतचं आवाहन केलं.
दुसऱ्या दिवशी भुतो ना भविष्यती असा जनसागर मुंबईत एकवटला.आणि शिवतीर्थावर अवघ्या महाराष्ट्राने सच्चा,दिलदार,कणखर,करारी,प्रतिभावंत नेत्याला अश्रू नयनांनी शेवटचा निरोप दिला…