शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह चाळीस आमदारांनी गुवाहाटीतल्या ज्या कामाख्या देवीचं दर्शन घेतलं,त्या देवीची ही महती तुम्हाला माहितेय का?

भारतीय संस्कृतीमध्ये देवी पूजनाला विशेष महत्व प्राप्त आहे. महाराष्ट्रात कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची भवानी आई, मुंबईची मुंबादेवी, कोकणातील एकविरा आई तर पालघरची जीवदानी देवी हि प्रमुख देवींची तिर्थस्थानं आहेत, त्याचप्रमाणे भारताच्या उत्तरेकडे आणि कोलकत्तामध्येही अनेक देवींची मंदिरं आहेत. त्यातलंच एक म्हणजे कामाख्या देवीचं मंदिर.

हे मंदिर महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर मोठ्या प्रमाणात चर्चेत आलंय आणि याच कारण म्हणजे महाराष्ट्रातील सत्ता पालटासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह चाळीस आमदारांनी केलेली प्रार्थना.सत्ता स्थापनेआधी एकनाथ शिंदेंनी कामाख्या देवीचं दर्शन घेऊन महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापनेचा दावा केला होता.यानंतर ते मुख्यमंत्री झाले आणि केल्या प्रार्थनेला फळ मिळालं म्हणून स्पेशल विमानाने त्यांनी शनिवारी पुन्हा देवीचं दर्शन घेतलं.याच कामाख्या देवीची महती आणि रंजक बाबी आपण या लेखातून पाहाणार आहोत.

आसामची राजधानी असलेल्या गुवाहाटी परिसरात देवी कामाख्याचे मंदिर आहे. ५१ शक्तिपीठांपैकी एक म्हणून देवी कामाख्या मंदिर ओळखले जाते. या मंदिरात स्त्रीशक्तीचा जागर अगदी उत्साहाने साजरा केला जातो.तंसच विशेष म्हणजे एखादी स्त्री रजस्वला झाली म्हणजेच जर तिला मासिकपाळी आली तर तिला वेगळं बसवणं, धार्मिक कार्यात सहभागी न करणं ही प्रथा काही कुटूंबात अजूनही पाळली जाते. तिच्या मासिक पाळीला विटाळ ठरविले जाते.

परंतु देवी कामाख्या मंदिरात रजस्वला झालेल्या कामाख्या देवीचे पूजन केले जाते. स्त्रीची मासिक पाळी ही एक नैसर्गिक क्रिया आहे. या प्रक्रियेमुळे एक जीव जन्म घेतो. त्यामुळे या मासिक पाळीचा आदर करत रजस्वला कामाख्या देवीची पूजा केली जाते.

देवी सतीचे दुसरे नाव म्हणजे कामाख्या. जेव्हा भगवान विष्णू आणि देवी सती यांच्यात युद्ध झाले तेव्हा भगवान विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने देवी सतीला ठार मारले. तेव्हा तिच्या योनीचा भाग हा आसामच्या गुवाहाटी परिसरात पडला. त्यावेळेस देवी सती ही रजस्वला होती म्हणजेच तिला मासिक पाळी आली होती. त्यामुळे हा परिसर लाल बुंद झाला. त्यामुळे हा परिसर देवी कामाख्या मंदिर म्हणून ओळखला जातो, अशी आख्यायिका आहे.

या मंदिरात कुठल्याही देवीची मूर्ती किंवा प्रतिकात्मक फोटो नसून एका दगडात कोरलेल्या कामाख्या देवीच्या रजस्वला योनीची पूजा केली जाते. देवी रजस्वला असल्याने दगडात कोरलेला तिचा योनीचा भाग हा कुंकवाने लाल असतो. आसाममधील हे एकमेव असे मंदिर आहे जेथे स्त्रियांना मासिकपाळी दरम्यान मंदिरात जाण्यास प्रवेश आहे. वयात आलेल्या कुमारिकांसाठी येथे अनुष्ठान करण्यात येते.

हिंदू धर्मातील पुराणानुसार जिथे जिथे सतीच्या देहाचा तुकडा किंवा तिचे वस्त्र वा दागिने पडले, त्या भागात शक्तीपीठ निर्माण झाले आहेत असे सांगितले जाते.त्यामुळे देवी कामाख्या मंदिर हे ५१ शकिपीठांपैकी एक मानले जाते.

विशेष म्हणजे या मंदिरात येणाऱ्या भाविकांना लाल पाण्यात भिजवलेला कपडा देवीचा प्रसाद म्हणून दिला जातो. या मंदिरात मासिक पाळी आलेल्या स्त्रीची पूजा केली जाते.त्याचप्रमाणे हे मंदिर रहस्यमय असल्याचेही म्हटले जाते. येथे तंत्र मंत्र करणारे मांत्रिक असतात व या मंदिराच्या परिसरात अघोरी विद्या धारण करण्यासाठी अनेक मांत्रिक तपश्चर्या करत असतात. असे म्हटले जाते.

भारतीय इतिहासानुसार हे मंदिर आठव्या शतकात उभारण्यात आले असून सोळाव्या शतकात नष्ट होण्याच्या मार्गावर होते, परंतु बिहारच्या राजाने सतराव्या शतकात हे मंदिर नव्याने उभारले. हे एकमेव असे मंदिर आहे जिथे स्त्रीची मासिक पाळी विटाळ न मानता तिची शुद्ध मनाने पूजा केली जाते.

आचार्य नीती

राजकीय, सामाजिक, साहित्यिक आणि अभ्यासपूर्ण माहितीसाठी आचार्य नीती हे सांकेतिकस्थळ सुरु करण्यात आलं आहे. महाराष्ट्रासह देशभरातील विविध घटना,ताज्या घडामोडी यांचे सखोल विश्लेषण तुम्हाला या सांकेतिक स्थळावर वाचायला मिळेल. यामाध्यमातून आम्ही सातत्यापूर्ण आपल्यापर्यंत विश्वासनीय आणि वैचारिक माहिती पोहचवत राहू.आमच्यासोबत जोडले जा आणि अभ्यासपुर्ण माहिती वाचत राहा.
Back to top button

You cannot copy content of this page