सत्य साईबाबांचं खरं सत्य माहितेय का? वाचून तुम्हीही व्हाल आवाक!

- हवेत हात फिरवायचा आणि त्या हातातून सोन्याची चैन काढून भक्तांना आवाक करायचं. कधी भक्तांना आशीर्वाद देता-देता हातातून अंगारा भक्तांच्या हातात द्यायचा, यांसारख्या चमत्कारांनी सत्यसाईबाबांची क्रेझ देशभर पसरली होती. सत्यसाईबाबांच्या भक्तसंख्येत देखील यामुळे दिवसेंदिवस वाढ होत होती.
२०२२ मध्ये मी स्वत:ची महासमाधी घेणार, असं म्हणणाऱ्या सत्य साईबाबांनी २०११ सालीच या जगाचा शेवटचा निरोप घेतला. याच सत्य साईबाबांची आज ९७ वी जयंती. हॉस्पिटलं, शैक्षणिक संस्था, पाण्याच्या टाक्या उभारत लोकांमध्ये स्वत:ची दैवी पुरूष म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या या सत्य साईबाबांचे बहुतांश लोक चाहते होते. यामध्ये सचिन तेंडुलकर, अटलबिहारी वाजपेयी, सुनिल गावस्कर, ऐश्वर्याराय बच्चन यांसारख्या दिग्गजांचाही समावेश होता.
हवेत हात फिरवायचा आणि त्या हातातून सोन्याची चैन काढून भक्तांना आवाक करायचं. कधी भक्तांना आशीर्वाद देता-देता हातातून अंगारा भक्तांच्या हातात द्यायचा, यांसारख्या चमत्कारांनी सत्यसाईबाबांची क्रेझ देशभर पसरली होती. सत्यसाईबाबांच्या भक्तसंख्येत देखील यामुळे दिवसेंदिवस वाढ होत होती.
वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांना विंचू चावला आणि यानंतर त्यांना आपण दैवी अवतार असल्याचा साक्षात्कार झाला, अशी कथित कथा त्यांच्या भक्तांकडून सांगितली जाते. जवळपास सत्तरच्या दशकापासून सत्यसाईबाबांचे वलय देशात मोठ्या प्रमाणात तयार होत होते. त्यांच्या चमत्काराच्या कथा देखील गावा-गावात सांगितल्या जात होत्या.त्यांच्या नामस्मरणाने सत्संग भरत होते.
दरम्यान टेलिव्हिजनच्या कॅमेऱ्यांनी देशात शिरकाव केला आणि सत्य साईबाबांचे सत्य माध्यमांसमोर येऊ लागले. जवळपास नव्वदच्या दशकात तत्कालिन पंतप्रधान पि.व्हि.नरसिंहराव यांच्या उपस्थितीत एक सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सत्यसाईबाबांच्या हस्ते सत्कारमुर्तींचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला जाणार होता. याचं कव्हरेज देशपातळीवर माध्यमं करत होती. याच कार्यक्रमात सत्य साईबाबांचं पहिलं सत्य लोकांसमोर आलं.
घडलं असं, सत्कारमुर्तीला सन्मानित करण्यासाठी सन्मानचिन्ह घेवून एक व्यक्ती व्यासपीठावर आला. या व्यक्तीने हे सन्मानचिन्ह सत्य साईबाबांच्या हातात दिलं. हे सन्मानचिन्ह सत्यसाईबाबांनी हातात घेतलं आणि सत्कारमुर्तींच्या हातात देताना हवेत हात फिरवत हातातून सोन्याची साखळी काढत ती देखील सन्मानचिन्हासोबत सत्कारमुर्तींला दिली. समोर बसलेल्या प्रत्येकाला हा चमत्कार वाटला. उपस्थितांनी टाळ्यांचा जोरदार कडकडाट केला. प्रत्येकाला हा सत्य साईबाबांचा चमत्कार वाटत होता. दरम्यान माध्यमांच्या कॅमेरांनी हा प्रसंग काही औरच टिपला होता.
कॅमेऱ्यामध्ये स्पष्ट दिसत होतं. सत्कारमुर्तीला सन्मानित करण्यासाठी सन्मानचिन्ह घेवून आलेल्या व्यक्तीनं सन्मानचिन्ह सत्य साईबाबांना देताना त्याच्याकडे आपल्या हातात असलेली सोन्याची चैन देखील त्यांच्या हातात सुपूर्त केली होती.हि दृश्य त्या काळी दुरदर्शनसह सर्वींकडे प्रसारित झाली आणि मग सत्यसाईबाबांच्या चमत्कारावर संशय व्यक्त केला जाऊ लागला.
अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोळकरांनी यावर एक सीडी तयार करत सत्य साईबाबांचा पर्दाफाश केला. तरीही लोकं सत्यसाईबाबांवर विश्वास ठेवत होती. दुसरीकडे सत्यसाईबाबांचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न जादुगार पीसी सरकार जूनियर करत होते.
जादुगार पीसी सरकार जूनियर यांनी सत्य साईबाबांना भेटण्यासाठी जवळपास एक महिना प्रयत्न करून बघितले, पण जादुगार ऐकल्यावर सत्यसाईबाबा त्यांना भेट नाकारायचे. पीसी सरकार यांनी पाठवलेले अर्ज सतत रिजेक्ट केले जायचे. या विरोधात पीसी सरकार यांनी एक युक्ती केली आणि बंगालच्या एका उद्योगपतीच्या मुलाचा वेश करून साईबाबांना भेटण्यासाठी अर्ज केला. त्यावर ताबडतोब सत्य साईबाबांनी त्यांना भेटायला वेळ दिली.
यानंतर सरकार यांना एका खोलीमध्ये दर्शनासाठी बोलावण्यात आले. भेट झाल्यानंतर त्यांनी सत्य साईबाबांचा आशीर्वाद म्हणून काहीतरी देण्याची मागणी त्यांना केली. बाबांनी त्यांना वाट बघायला सांगितली आणि दुसऱ्या खोलीतून जाऊन २ मिनिटांनंतर ते बाहेर आले.
बाबांनी परत आल्यानंतर नेहमीप्रमाणे हवेत हात फिरवून सरकार यांना संदेश नावाची बंगाली मिठाई काढून दिली. सरकारना पण हेच हवं होतं. कारण जादुगार असलेले सरकार आता बाबांची जादू बघणार होते.
सरकारांनी सत्यसाईबाबांना सांगितले,’मला संदेश मिठाई नाही तर रसगुल्ले खायला आवडतात’.यानंतर सत्य साईबाबांनी पण संदेशला लगेच रसगुल्ल्यात बदलले. सरकारांनी मस्तपैकी रसगुल्ले खाल्ले आणि बाहेर येऊन दंगा केला.
तो काही दैवी अवतार नाही, तर आमच्यासारखाच एक जादुगार आहे. किंबहुना आमच्यापेक्षाही खराब जादुगार आहे आणि जादू आली म्हणजे कोण दैवी पुरुष होत नाही. पीसी सरकार यांचा दंगा बघून सत्यसाईबाबांच्या अनुयायांनी त्यांना आश्रम बाहेर काढलं. भक्त सत्यसाईबाबांच्या भक्तीत पार आंधळे झाले होते.
लांब-लाबून ते सत्यसाईबाबांना भेटायला येत होते. दरम्यान त्यांचे भक्त राहिलेल्या सिडनीचे बँकर डी. क्रेकर यांना बाबांचा वाईट अनुभव आला होता. त्यांचे आश्रमात लौगिंक शोषण झाल्याचा आरोप त्यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केला होता.
सत्यसाईबाबा स्वत:ला सिद्ध पुरूष मानत होते. मोठ-मोठ्या विषयांवर ते भक्तांना भाषण देत होते. त्यांची चर्चा विदेशात देखील होत होती. त्यांनी स्वत:च्या मृत्यूविषयी भाष्य करताना आपण दोन हजार बावीस (२०२२) साली महासमाधी घेणार असल्याचं सांगितलं होतं. तसंच पुढील जन्मी मैसूरमध्ये ‘प्रेमसाई’ या नावाने अवतार घेणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं होतं.
मात्र,त्यांनी सांगितलेलं भाकित नियतीला मान्य नव्हतं. वयाच्या ८६ व्या वर्षी २४ एप्रिल २०११ ला वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं. पण निधन झाल्यानंतर, तब्बल दोन महिन्यानंतर सत्य साईबाबा यांच्या प्रशांती निलायम आश्रमाच्या यजूर मंदिर या खासगी खोलीत जेव्हा तपास करण्यात आला. तेव्हा मोठं घबाड सापडलं.
९८ कि. सोनं, ३०७ कि. चांदी आणि ११.५६ कोटींची रोकड,तसंच ३८ कोटी रुपयांचे हिरे आणि विदेशी चलन असा सगळा माल या घाबडामध्ये होता. कालांतराने सत्यसाईबाबांची एकूण ४० हजार कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं समोर आलं होतं.