सरसेनापती हंबीररावांची कन्या कशी बनली स्वराजाची छत्रपती? वाचा ताराराणींचा जाज्वल्य इतिहास

- मराठा मावळ्यांचं हे सैन्य ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करत होतं त्या ताराराणी मुळ कऱ्हाडच्या हंबीरराव मोहित्यांच्या कन्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सून होत्या.राज्यकारभार कसा चालवावा याचे बाळकडू घरातच मिळाल्याने त्यांना राजकारभारात फारसा अडथळा आला नाही.
भला मोठा युद्ध अनुभव गाठीशी असलेल्या आलमगीर औरंगजेबाची अवघ्या पंचवीस वर्षीय ताराराणींनी आपल्या शौर्याने झोप उडवली होती.आजची गोष्ट याच कर्तबगार ताराराणींची आहे.छत्रपती राजाराम महाराजांच्या निधनानंतर समोर उभ्या ठाकलेल्या मोघली आव्हानाला निखराने तोंड देण्यासाठी ताराराणींनी आपल्या पुत्राला शिवाजी (दुसरे) यांना राजगादीवर बसवलं आणि राज्यकारभाराची सर्व सुत्रं त्यांनी आपल्या ताब्यात घेतली.
यानंतर त्यांनी राज्यकारभारात आणि लष्करी कारवायांमध्ये स्वत:हून भाग घेण्यास सुरूवात केली.यावेळी त्याच्यासोबत धनाजी जाधवराव, दुसरे हंबीरराव मोहिते, नेमाजी शिंदे, दुसरे राणोजी घोरपडे, शंकराजी नारायण, रामचंद्र अमात्य,परशुराम त्रिंबक असे करारी सेनानी होते. त्यामुळे मुघलांशी सामना करणं मराठ्यांच्या फौजेला दिशा देणारं ठरत होतं. राजारामांनंतर ताराराणींनी स्वत:हून हातात घेतलेली तलवार ही मावळ्यांमध्ये स्फुरण भरत होती.
मुघलांसोबत जवळपास १७ ते १८ वर्ष मराठ्यांनी संघर्ष केला.या संघर्षात मुघलांना मराठ्यांनी जशास तसं उत्तर दिलं. एक राणी आपल्या पतीच्या निधनानंतर मुरब्बी,हुशार आणि कपटनीती करणाऱ्या सम्राटास जेरीस आणते,ही गोष्टच औरंगजेबाला स्वस्थ बसू देत नव्हती. ताराराणी सततचा संघर्ष करून औरंगजेबाला रणात पराभूत करत होत्या, ही बाब त्यांची किर्ती अधोरेखित करते. राज्यकारभाराची सूत्रे कुशलतेने हाताळणाऱ्या आणि लष्करी मोहिमांची यशस्वी आखणी करणाऱ्या ताराराणी यांच्याबद्दल शत्रूनेही कौतुकोउद्गार काढत ताराराणींबद्दल लिहीलंय.
औरंगजेबाचा इतिहासकार खाफीखान ताराराणींबद्दल लिहिताना म्हणतो,’राजारामाची राणी ताराराणी हिने विलक्षण धुमधाम माजवली आहे.तिने लवकरच सेनापतींच्या नेमणुका आणि त्यांच्यात करावयाचे बदल, राज्यातील खेडीपाडी संघटित करणे, मोगल प्रदेशात स्वाऱ्यांची योजना इत्यादी विषय आपल्या हाती घेऊन तिने राज्याच्या सर्व कारभाराची सूत्रे आपल्या नियंत्रणाखाली आणली आहेत. तीच्या सैन्याच्या नेतृत्वाचे आणि मोहिमांचे तसेच व्यवस्थेचे गुण प्रकर्षाने प्रकट झाले आहेत. त्यामुळेच मराठ्यांचे आक्रमण आणि त्यांची धामधूम दिवसेंदिवस वाढतच चालली आहे’.
‘दक्षिणेतील सहा सुभ्यांवर स्वाऱ्या करण्याकरिता, नव्हे माळव्यातील सिरोंज आणि मंदसोर या प्रदेशापर्यंत हल्ले चढविण्याकरिता सैन्य पाठविण्याची तिने अशी काही व्यवस्था केली आणि आपल्या सेनाधिकाऱ्यांची अंतःकरणे तिने त्याकरिता अशी काही आपलीशी करुन घेतली की त्यामुळे औरंगजेबाने मराठ्यांना नष्ट करण्याकरिता आपल्या कारकिर्दीच्या अखेरीपावेतो जे जे प्रयत्न केले ते सर्व अयशस्वी ठरले’.
याचसोबत मराठ्यांच्या स्थितीचे वर्णन करताना खाफीखान म्हणतो, ‘बादशहाने मराठ्यांच्या देशात शिरून त्यांचे गगनचुंबी किल्ले घेतले, मराठ्यांना बेघर करून सोडले पण मराठ्यांचा पराक्रम वाढतच गेला. बादशहा आणि त्यांचे उमराव डोंगराळ प्रदेशात आहेत, हे पाहून मराठे मोठमोठे सैन्य घेऊन बादशाही मुलुखात घुसून आक्रमण करून उच्छाद मांडू लागले. ताराराणींचे सरदार जेथे जेथे जात, तेथे आपले कायम बस्तान बसवीत आणि भोवतालच्या मोघली सैन्यास लुटून ते मालमत्ता आपल्या राज्यासाठी नेत.यामुळे मोघली सैन्याचा फार काळ टिकाव लागत नसत’.
मराठा मावळ्यांचं हे सैन्य ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करत होतं त्या ताराराणी मुळ कऱ्हाडच्या हंबीरराव मोहित्यांच्या कन्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सून होत्या.राज्यकारभार कसा चालवावा याचे बाळकडू घरातच मिळाल्याने त्यांना राजकारभारात फारसा अडथळा आला नाही. दरम्यान, औरंगजेबाशी निखराने लढणाऱ्या ताराराणींना कौटुंबिक राजकारणाला सामोरं जावं लागलं.यात त्यांना नजरकैदेत राहावं लागलं.अश्या परिस्थितीतही त्यांनी स्वराजाला दिशा देण्याचं आणि मराठा साम्राज्य अजिंक्य ठेवण्याचं काम केलं.ताराराणींनी मराठाशाहीचा छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते पानिपतच्या भयान युद्धापर्यंतचा काळ जवळून पाहिला होता.दरम्यान पानिपतच्या युद्धात मराठ्यांना पराभव पत्करायला लागला.याच दरम्यान डिसेंबर १७६१ मध्ये सातारमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
ताराराणींचं शौर्य,त्यांनी गाजवलेला पराक्रम,औरंगजेबाला मराठ्यांच्या स्त्रीयांची दाखवलेली ताकद यामुळे छत्रपती ताराराणी या इतिहासाच्या पानांवर आजरामर झाल्या आहेत.त्यांना आजच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
संदर्भ
जदुनाथ सरकार, इंडिया अंडर औरंगजेब