माईंच्या माघारी अनाथाश्रमाचा गाडा चालतोय कसा?

- माईंनी आयुष्यभर मोठा संघर्ष केला या संघर्षातून त्यांनी समाजातील अनाथांचे उघड्या डोळ्यांनी हाल पाहिले आणि त्यांना मायेनं आपल्या कवेत घेत मातृत्वाच्या छत्राखाली आणलं.भाषण नाही तर राशन नाही असं म्हणणाऱ्या माईंचा आश्रम आता कसा चालतो?
४ जानेवारी २०२२ रोजी सिंधूताईंनी अनेक लेकरांना पोरकं करून या जगाचा निरोप घेतला.या घटनेला आज एक वर्ष पुर्ण झालंय. स्वत: सोसलेल्या हाल अपेष्टा कुणाच्या वाटयाला येऊ नयेत म्हणून माईंनी हजारो अनाथ मुलांना आपल्या कुशीत घेतलं. त्यांचं उत्तमरित्या संगोपन केलं. गावोगावी जाऊन आपली व्यथा अनेकांसमोर आपल्या भाषणातून मांडली आणि यातून अनाथांसाठी पदर पसरून मदत करण्याचं आवाहन केलं. मात्र, माईंचं जाणं हे अनेकांच्या जिव्हारी लागणारं होतं.
माईंनी इहलोकातलं आपलं कार्य संपवून एका वर्षापूर्वी या जगाचा निरोप घेतला. माईंनी आजवर राज्यभरात पाच अनाथाश्रम तर दोन गोशाळा उभारलेत. या अनाथश्रमात २१०० हून अधिक मुलं-मुली आहेत.माईंच्या जाण्यानं या अनाथश्रमात मातृत्वाची पोकळी निर्माण झालेय. मात्र,माईंच्या माघारी या आश्रमांची देखभाल कोण करत असेल? माई सांगायच्या ‘भाषण नाही तर राशन नाही’,पण माईंच्या माघारी या अनाथश्रमासाठी कोण भाषण देतंय? सध्या या अनाथश्रमातील मुलांचं संगोपन कसं केलं जातंय? या सर्व प्रश्नांची उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.
माईंनी आयुष्यभर मोठा संघर्ष केला या संघर्षातून त्यांनी समाजातील अनाथांचे उघड्या डोळ्यांनी हाल पाहिले आणि त्यांना मायेनं आपल्या कवेत घेत मातृत्वाच्या छत्राखाली आणलं. याचसोबत त्यांना माईंनी धीरही दिला. मात्र माईंच्या माघारी द मदर ग्लोबल फाउंडेशन ही माईंनी उभारलेली संस्था माईंची मुलगी ममता सकपाळ,दिपक गायकवाड आणि विनय सकपाळ यांच्या माध्यमातून चालवण्यात येत आहे.तसंच तुषार सकपाळ,यश सुर्यवंशी, लौकिक शाह, सीमा रोठे यांचा देखील संस्थेला हातभार लागत आहे.

ममता सकपाळ या सप्तसिंधू महिला आधार, बालसंगोपन आणि शिक्षण संस्था, पुणे या संस्थेची जबाबदारी सांभाळतात.तर दिपक गायकवाड हे वनवासी गोपाळकृष्ण बहुउदेशी मंडळ, चिखलदरा, अमरावतीची जबाबदारी सांभाळतात.तर विनय सकपाळ हे या संपुर्ण संस्थेचे सर्वेसर्वा आहेत.माईंच्या माघारी या तिघांनीही उत्तमरित्या आपल्या जबाबदाऱ्या वाटून घेऊन त्या जबाबदाऱ्या योग्यरित्या पार पाडण्याचं काम करत आहेत. याचसोबत माईंनी अनाथ म्हणून सांभाळलेली अनेक मुलं आज तरूण वयात आली आहेत.ही मुलं काम करत-करत संस्थेसाठी हात भार लावत आहेत.
भाषण नाही तर राशन नाही असं म्हणणाऱ्या माईंचा आश्रम आता कसा चालतो?
माईंनी आपली व्यस्था समाजासमोर मांडून समाजापुढे मदतीसाठी पदर पसरला आणि या अनाथाश्रमाचा गाढी सुरळीत चालवला.मात्र आता माईंच्या माघारी ममता सकपाळ,दिपक गायकवाड आणि विनय सकपाळ हि त्यांची मुलं संस्थेसाठी पै-पै जमा करण्यासाठी मेहनत घेत आहेत. या व्यतिरिक्त अनेक संस्था,सामाजिक कार्यकर्ते हे देखील आपल्या माध्यमातून शक्य होईल तितकी मदत या संस्थाला करत आहेत.
खरंतर सरकार मला पुरस्काराव्यतिरिक्त कोणतीही आर्थिक मदत करत नाही ही खंत माईंनी अनेक कार्यक्रमात बोलून दाखवली आहे.पुरस्काराने पोट भरत नाही,म्हणूनच मला आजही भाषण करावं लागत आहे,असं माई सांगायच्या.मात्र,आजवर सरकारच्या मदतीशिवाय माईंनी हा संस्थेचा गाडा समर्थपणे चालवला आहे.तसंच आजही सरकारच्या मदतीशिवाय हा संस्थेचा गाडा आजही असाच सुरू राहावा यासाठी या संस्थेतील अनेक हात जे माईंच्या संस्कारांनी घडवलेत,ते काम करतायेत.
माई आज हयात नसल्या तरी त्यांनी विचाररूपी पेरलेली ही बीजं पिढ्यान्-पिढ्यांना अशीच कायम प्रेरणा देत राहतील आणि असहाय्य-गरजूंना मायेची उब देत राहतील.स्मृतीदिनी माईंना विनम्र अभिवादन!