कर्नाटकातील मराठी भाषिकांसाठी छगन भुजबळ बनले होते इकबाल शेख..

थोडक्यात
  • कानडी-मराठी हा वाद कित्येक वर्षांपासून कर्नाटकात अनुत्तरितच आहे. बेळगावातील कानडी मराठीच्या ठिणगीमुळे कायम वणवा पेटत राहिला आहे. याचदरम्यान शिवसेनेने बेळगावातील मराठी भाषिकांच्या कायम पाठीशी उभं राहत आक्रमक भूमिका घेतली आहे. 'पस्तीस वर्षांपूर्वी शिवसेना नेते छगन भुजबळ यांनी कन्नड भाषेच्या सक्तीविरोधात बेळगावात वेषांतर करून आंदोलन केले होते. ही गोष्ट याच आंदोलनाची आहे.

सध्या राज्यात महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील जत तालुक्यावर केलेल्या वक्तव्यानंतर सीमावादावर वाद पेटण्याची चिन्ह आहेत. अश्यात महाराष्ट्राने याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. दरम्यान याच कर्नाटकने याआधी भाषा वाद उकरून काढत वाद निर्माण केला होता. याला महाराष्ट्रातील नेत्यांनी इंगा दाखवत कश्यापद्धतीने झुकवलं होतं याची गोष्ट आज आम्ही आपल्यासमोर उलघडणार आहोत.

कानडी-मराठी हा वाद कित्येक वर्षांपासून कर्नाटकात अनुत्तरितच आहे. बेळगावातील कानडी मराठीच्या ठिणगीमुळे कायम वणवा पेटत राहिला आहे. याचदरम्यान शिवसेनेने बेळगावातील मराठी भाषिकांच्या कायम पाठीशी उभं राहत आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘पस्तीस वर्षांपूर्वी शिवसेना नेते छगन भुजबळ यांनी कन्नड भाषेच्या सक्तीविरोधात बेळगावात वेषांतर करून आंदोलन केले होते. ही गोष्ट याच आंदोलनाची आहे.

तर झालं असं, महाराष्ट्रातून जाणाऱ्या सीमा या बेळगावमध्ये बंद करण्यात आल्या, म्हणून छगन भुजबळ यांनी खुद्द दुबईचे व्यापारी इक्बाल शेख यांचे वेषांतर करून गोवामार्गे बेळगावात प्रवेश करून कानडी पोलिसांना आश्चर्याचा धक्का दिला होता. 

१९८६ मध्ये कारवार भागात कर्नाटक सरकारने कन्नड भाषेची सक्ती केली. त्यात मराठी भाषिकांचा आवाज दाबून टाकण्याचे त्यांचे धोरण होते. त्याविरोधात शिवसेना आक्रमक भूमिका घेत बेळगावमधील मराठी भाषिकांच्या हक्कासाठी उभी राहिली. कर्नाटक सीमेवरून महाराष्ट्रातील कोणालाही बेळगावला येऊ दिले जात नव्हते. त्यामुळे याविरोधात आक्रमक झालेली शिवसेना विरोध व आंदोलनावर ठाम होती.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तशी घोषणाच केली होती. यादरम्यान शिवसेनेचे आक्रमक नेते असलेल्या छगन भुजबळ यांनी दाखवलेल्या धाडस व कल्पकतेमुळे शिवसेना मराठी भाषिकांसाठी बेळगावात आंदोलन करण्यात यशस्वी झाली होती.

महाराष्ट्रातून बेळगावला जाणाऱ्या सीमा बंद असल्याने एखाद्या चित्रपटाच्या कथानकासारखे रंजक असे नियोजन करण्यात आले. ४ जून रोजी शिवसेना नेते छगन भुजबळ यांनी गोवामार्गे बेळगावला जाण्याचा पर्याय स्वीकारला. कानडी पोलिसांना चकवा देत आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी दुबईचे व्यापारी इक्बाल शेख यांची वेशभूषा केली. मुंबईवरून अॅम्बासेडर कार घेऊन ते गोवामार्गे बेळगावात दाखल झाले.

यानंतर शिवरायांनी शिकवलेल्या गनिमी काव्याचा वापर करत मराठी भाषिकांच्या अस्तित्वासाठी त्यांनी बेळगावात आंदोलन केले. भुजबळांनी केलेल्या आंदोलनामुळे त्यांना कानडी पोलिसांनी अटक केली व त्यांना दोन महिने धारवाड कारागृहात ठेवण्यात आले. इतका कडक बंदोबस्त असूनही महाराष्ट्रातून येऊन बेळगावात मराठी भाषिकांसाठी आंदोलन झालेच कसे हे काही कानडी पोलिसांना समजले नाही.

अखेर दोन महिन्यांनी धारवाड कारागृहातून भुजबळ यांची सुटका झाल्यावर ते मुंबईला परतले. तेव्हा त्यांनी दाखवलेल्या धाडसाचे, कल्पकतेचे आणि जिद्दीचे शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कौतुक केले.या आंदोलनात भुजबळ यांच्या समवेत दगडूदादा सपकाळ, बाबा पिंगळे, अरविंद तायडे, हेमंत मंडलिक असे विविध शिवसेना नेते व कार्यकर्ते होते. त्यांना वेशभूषा करण्यासाठी शिवसेना नेते प्रमोद नलावडे यांनी देखील मदत केली होती. 

या चित्तथरारक घटनेला जी पस्तीस वर्ष पूर्ण झाली आहेत.दरम्यान त्यावेळी शिवसेना कायम मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी सदैव तत्पर आहे,असा सार्थ विश्वास छगन भुजबळ यांनी बेळगावातील मराठी भाषिकांना दिला होता आणि त्यानंतर ते मुंबईत परतले होते.

आचार्य नीती

राजकीय, सामाजिक, साहित्यिक आणि अभ्यासपूर्ण माहितीसाठी आचार्य नीती हे सांकेतिकस्थळ सुरु करण्यात आलं आहे. महाराष्ट्रासह देशभरातील विविध घटना,ताज्या घडामोडी यांचे सखोल विश्लेषण तुम्हाला या सांकेतिक स्थळावर वाचायला मिळेल. यामाध्यमातून आम्ही सातत्यापूर्ण आपल्यापर्यंत विश्वासनीय आणि वैचारिक माहिती पोहचवत राहू.आमच्यासोबत जोडले जा आणि अभ्यासपुर्ण माहिती वाचत राहा.
Back to top button

You cannot copy content of this page