देव आणि भक्त यांच्यामध्ये कुणीही दलाली करू नये म्हणून ज्योतिबांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती,वाचा रंजक गोष्ट

थोडक्यात
  • स्त्री शिकली तर ती उद्याचा समाज घडवू शकते,ही ज्योतिबांची त्या मागची भावना होती आणि म्हणूनच १८४८ मध्ये पुण्यातील भिडे वाडा या ठिकाणी त्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली.सर्वात आधी महात्मा फुले यांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण दिले. त्यांना पहिली महिला शिक्षिका बनवलं. मग हळूहळू सर्व समाजातील स्त्रीयांना त्यांनी शिक्षणासाठी आवाहन केलं.

स्त्री शिक्षण, विधवा विवाह, पुनर्विवाह, संमतीवय बालविवाह यांसारख्या ज्वलंत विषयांवर भाष्य करत समाज प्रबोधन करणाऱ्या आणि या विषयांना पुर्णत्व प्राप्त करून देणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांची आज पुण्यतिथी. तत्कालिन भारतीय समाजात रूढ असलेल्या चूकीच्या रूढी परंपरांवर परखडपणे भाष्य करत ज्योतिबांनी समाजमनं ढवळून काढली. तसंच यामाध्यमातून त्यांनी स्त्रीशिक्षणाची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यास सुरूवात केली.

स्त्री शिकली तर ती उद्याचा समाज घडवू शकते,ही ज्योतिबांची त्या मागची भावना होती आणि म्हणूनच १८४८ मध्ये पुण्यातील भिडे वाडा या ठिकाणी त्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली.सर्वात आधी महात्मा फुले यांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण दिले. त्यांना पहिली महिला शिक्षिका बनवलं. मग हळूहळू सर्व समाजातील स्त्रीयांना त्यांनी शिक्षणासाठी आवाहन केलं.

मात्र तत्कालिन समाजानं स्त्री शिक्षणाला विरोध करून फुले दामप्त्यांवर शेण आणि दगडांचा मारा केला.मात्र याला न जुमानता फुले दामप्त्यांनी आपली स्त्री शिक्षणाची चळवळ सुरूच ठेवली. त्यानंतर लगेचच त्यांनी अस्पृश्यांकरीता देखील शाळा सुरु केली. येवढंच नाही तर अस्पृश्य स्त्रियांकरीता त्यांनी तब्बल ६ शाळा चालविल्या. दरम्यानच्या काळात त्यांनी १८८२ मध्ये हंटर आयोगाकडे सर्वांना प्राथमिक, माध्यमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करण्याची मागणी केली.

यानंतर कुठेही न थांबता फुलेंनी, समाजातील जातिभेद, अनिष्ट प्रथा, तसेच समाजातील उच्चवर्णीयांची मक्तेदारी यावर भाष्य करणारा ‘शेतकऱ्यांचा आसूड’ हा ग्रंथ लिहीला. समाज प्रबोधन आणि परिवर्तनवादी चळवळीसाठी हा ग्रंथ महत्त्वाचा ठरला.

स्त्री शिक्षणाबरोबरच महात्मा फुले यांनी विधवांच्या हक्कांसाठी देखील संघर्ष केला. १८६० मध्ये विधवा पुनर्विवाहास प्रोत्साहन, १८६३ मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करत त्यांनी अनिष्ठ चालीरितींविरोधात हासूड ओढला. तसंच १८६४ मध्ये विधवा विवाह घडवून आणला.महात्मा फुलेंनी केलेलं हे कार्य हळूहळू देशपातळीवर पोहच होतं आणि त्यांनी जनतेचं बळ मिळत होतं.यातून त्यांनी १८६५ मध्ये विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.

सत्यशोधक समाजाची स्थापना

महात्मा जोतिराव फुले यांनी तत्कालिन समाजात ब्राम्हण समाजाची सुरू असलेली मक्तेदारी मोडून काढण्यासाठी आणि देव व भक्त यांच्यामध्ये कुणीही न राहता थेट देवाशी भक्ताचं नातं जोडण्यासाठी २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सामाजिक विषमता नष्ट करणे, सर्व घटकांपर्यंत शिक्षण पोहचवणे आदी सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. वर्णव्यवस्थेला आणि वेदांना झुगारत सत्यशोधक समाजाने काम सुरू केले.

यावेळी या सत्यशोधक समाजाची स्थापना करताना, ‘ईश्वर एक असून तो सर्वव्यापी, निर्विकार, निर्गुण व सत्यरूप आहे आणि सर्व मानव प्राणी त्याची प्रिय लेकरे आहेत. ईश्वराची भक्ती करण्याचा प्रत्येक मानवास पूर्ण अधिकार आहे, आईस संतुष्ट करण्यास अगर बापास विनवण्यास जशी त्रयस्थ दलालाची जरूर नसते, त्याप्रमाणे सर्वसाक्षी परमेश्वराची भक्ती करण्यास भट दलालाची आवश्यकता नाही.’असं तत्त्व ठरवण्यात आलं आणि सुरूवात झाली नवीन सामाजिक क्रांतीची.

सत्यशोधक समाजाचा सदस्य होताना खंडोबाची तळी उचलून प्रत्येक सभासदाला शपथ दिली जायची.या शपथीतून सत्यशोधक मार्गाने चालण्याचे आवाहन सभासदांना केले जायचे.कोणाला या समाजाचा सभासद होण्याची मुभा होती.ब्राम्हण,गावचा सावकार,इंग्रज सरकारचे काळेगोरे अधिकारी यांच्याकडून होणाऱ्या शोषणाला आणि अन्यायाला विरोध,तसंच बहूजनांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती.

जोतिबा फुले यांनी आपल्या ‘सार्वजनिक सत्यधर्म’ या पुस्तकात माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत होणाऱ्या कर्मकांडाची चिकित्सा केली. यात एकूण २८ विषयांवर तपशीलाने मांडणी केली. यातील एक विषय म्हणजे लग्न. याच लग्न प्रकरणात त्यांनी सत्यशोधक विवाहाबाबतची त्यांची भूमिका मांडली. गणपतराव आणि जोतीराव या दोघांमधील संवादाच्या स्वरुपातील या मांडणीत लग्न म्हणजे काय इथंपासून तर लग्न ठरवताना कोणते गूण पाहावेत इथपर्यंत फुलेंनी मांडणी केली.

भारतातील पहिली कामगार संघटना १८८० मध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांनी स्थापन केली. त्यांना कामगार संघटना स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन, मार्गदर्शन महात्मा फुले यांनी केले. महात्मा फुले यांनी १८७५ मध्ये शेतकऱ्यांच्या शोषणाविरोधात खतफोडीचे बंड घडवून आणले.१८८८ मध्ये मुंबईत जोतीराव फुले यांचा रावबहादुर विठ्ठलराव वंडेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि महात्मा ही पदवी देण्यात आली.

अश्या स्त्री शिक्षणाचे महत्त्व समाजाला पटवून देणाऱ्या आणि स्त्रीयांना ज्ञानाची गंगा खुली करणाऱ्या क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

आचार्य नीती

राजकीय, सामाजिक, साहित्यिक आणि अभ्यासपूर्ण माहितीसाठी आचार्य नीती हे सांकेतिकस्थळ सुरु करण्यात आलं आहे. महाराष्ट्रासह देशभरातील विविध घटना,ताज्या घडामोडी यांचे सखोल विश्लेषण तुम्हाला या सांकेतिक स्थळावर वाचायला मिळेल. यामाध्यमातून आम्ही सातत्यापूर्ण आपल्यापर्यंत विश्वासनीय आणि वैचारिक माहिती पोहचवत राहू.आमच्यासोबत जोडले जा आणि अभ्यासपुर्ण माहिती वाचत राहा.
Back to top button

You cannot copy content of this page