या गावात पडतो पैश्यांचा पाऊस पुसेगावची बैलगाडा शर्यत का आहे प्रतिष्ठेची,वाचा रंजक गोष्ट

- संत सेवागिरी महाराज यांचे प्रस्त असलेल्या पुसेगावाला सेवागिरी महाराजांमुळे जगभरात नावलौकिक मिळाला.सेवागिरी महाराजांच्या पुण्याईमुळे पुसेगाव समृद्ध झालं. असं म्हटलं जातं की,सेवागिरी महाराजांनी समाधी घेताना या गावात पैशाचा पाऊस पडेल अशी वाणी केली होती.
बैलगाडी स्पर्धेचा थरार,रथाची नगरप्रदक्षिणा,हजारो भाविकांची गर्दी,रथावर वाहल्या जाणाऱ्या नोटांच्या माळा,देवाच्या हत्तीची मिरवणूक,बैलांचा बाजार,मिठाईच्या दुकानावरची लगबग,श्वान स्पर्धेचा धुरूळा,कुस्तीचा आखाडा,कब्बडीचा माहोल आणि कृषी प्रदर्शनाचं आयोजन, हे सगळं चित्र आहे सातारा जिल्हातील पुसेगावच्या यात्रेचं.श्री सेवागिरी महाराजांच्या समाधी सोहळ्यानिमित्त पुसेगावमध्ये जवळपास दहा दिवसांच्या यात्रेचे आयोजन करण्यात येते.यंदा या यात्रेचं पंचाहत्तरावं अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि याच निमित्ताने आम्ही खास या यात्रेविषयीची रंजक माहिती तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
संत सेवागिरी महाराज यांचे प्रस्त असलेल्या पुसेगावाला सेवागिरी महाराजांमुळे जगभरात नावलौकिक मिळाला.सेवागिरी महाराजांच्या पुण्याईमुळे पुसेगाव समृद्ध झालं. असं म्हटलं जातं की,सेवागिरी महाराजांनी समाधी घेताना या गावात पैशाचा पाऊस पडेल अशी वाणी केली होती.तेव्हापासून दरवर्षी सेवागिरी महाराजांच्या समाधी सोहळ्यादिवशी त्यांच्या रथावर लाखोंच्या संख्येने भाविक नोट्यांच्या माळा चढवतात.यावेळी जमा होणारी रक्कम ही जवळपास कोटी रुपयांच्या आसपास असते.या रथावर नोटांच्या माळा चढवण्यासाठी महाराष्ट्रासह,गुजरात,कर्नाटक व इतर राज्यातूनही भाविक पुसेगावमध्ये दाखल होतात.

या यात्रेची सुरूवात मैदानी खेळापासून केली जाते.गावचं गावपण आणि संस्कृती जपत ही यात्रा मोठया उत्साहात साजरी होते.सुरूवातीला कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं जातं.ही स्पर्धा कुस्ती शौकिनांसाठी विशेष चर्चेत राहणारी स्पर्धा आहे.कारण,या स्पर्धेत राज्यासह देशामधील नावाजलेली पैलवान मंडळी सहभागी होऊन आपल्या कुस्तीचा डाव आणि अंगातली चालाखी पुसेगावकरांना दाखवत असतात.
यानंतर बैलगाडा शौकिनांसाठीची हिंदकेसरी बैलगाडा शर्यत आयोजित केली जाते.ही शर्यत महाराष्ट्रातली सर्वात प्रतिष्ठित बैलगाडा शर्यत आहे.या शर्यतीत महाराष्ट्रभरातून जवळपास सातशे ते आठशेच्या संख्येने शेतकरी आपली बैलगाडी आणि बैलजोडी घेऊन आपला सहभाग नोंदवत असतात.हि शर्यत विशेष लक्षवेधी असते.कारण,या स्पर्धेमुळे अनेक शेतकऱ्यांचं बैलगाडा शर्यत क्षेत्रातलं भवितव्य ठरत असतं.
यंदा या स्पर्धेचा निराळा रंग महाराष्ट्राला पाहायला मिळाला.बैलगाडा शर्यतीवर बंदी आल्यानंतर येथील शर्यत बंद झाली होती.त्यानंतर या शर्यतीवरची बंदी उठली.मात्र,वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे पुन्हा स्पर्धेवर बंधनं आली.यातूनही यंदा सर्व काही व्यवस्थित होऊ लागलंय असं वाटत असतानाच लंपी रोगाने महाराष्ट्रात शिरकाव केला आणि पुन्हा या स्पर्धेवर विर्जन पडलं.सुरूवातीला लंपीमुळे प्रशासनाने या शर्यतीला परवानगी नाकारली मात्र अवघे वीस तास बाकी असताना प्रशासनाने परवानगी देऊन बैलगाडा शर्यत सुरू करण्यास परवानगी दिली.मग आयोजकांनी तगडं आयोजन करून बैलगाडा शर्यतीची घोषणा केली आणि हजारोंच्या बैलगाडा शौकिनांच्या गर्दित हि स्पर्धा संपन्न झाली.दरम्यान यावेळी सोनारपाड्याच्या रिया जयेश पाटील यांचा सुप्रसिद्ध सोन्या ५०५० आणि मोहोलशेठ धुमाळ यांचा बकासुर या बैलजोडीनं पहिल्या क्रमांकावर आपली मोहोर उमटवली.तर अशी हि पुसेगावच्या सेवागिरी महाराजांची यात्रा दरवर्षी मोठ्या उत्साहात संपन्न होते.