गणेश नाईकांना आव्हान देणारा महिला चेहरा म्हणजे ‘मंदा म्हात्रे’

थोडक्यात
  • नवी मुंबईतल्या राजकारणातला सर्वात नावाजलेला चेहरा अशी ख्याती असलेल्या गणेश नाईकांच्या समोर मंदा म्हात्रेंचा काय निभाव लागणार? अश्या चर्चा नवी मुंबईत रंगू लागल्या होत्या. दुसरीकडे नव्याने तयार झालेल्या ऐरोली मतदार संघातून राष्ट्रवादीने गणेश नाईक यांचे धाकटे सुपुत्र संदिप नाईक यांना उमेदवारी देऊ केली. आता पिता-पुत्र दोघेही नवी मुंबईचं भवितव्य ठरवणार अशी नवी मुंबई करांची निश्चिती झाली.

मंदा म्हात्रे

तब्बल २० वर्ष राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत मंदा म्हात्रेंनी राजकिय क्षेत्रात काम केलं. या दरम्यान त्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून विधान परिषदेच्या आमदार देखील झाल्या. मात्र,राष्ट्रवादीचे नवी मुंबईतले तत्कालिन बडे नेते असलेल्या गणेश नाईकांच्या मनमानी कारभाराचं कारण देत २०१४ मध्ये मंदा म्हात्रे यांनी राष्ट्रवादीला सोड चिठ्ठी देत भाजपची वाट धरली आणि ऐन विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला बेलापूर पट्टीत मोठं खिंडार पडलं.

२०१४ मध्ये मंदा म्हात्रे यांनी तत्कालीन भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, भाजप नेते विनोद तावडे, आशिष शेलार यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आणि गणेश नाईकांसमोर कडवं आव्हान उभं केलं. भाजपने गणेश नाईकांच्या पराभवाची जबाबदारी मंदा म्हात्रेंवर सोपवत त्यांना पक्षाकडून विधानसभेची उमेदवारी दिली. हि निवडणूक विशेष लक्षवेधी होती. कारण, यावेळी मंदा म्हात्रेंच्या विरोधात राष्ट्रवादीने गणेश नाईक यांना बेलापूर मतदार संघातून उमेदवारी देत ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती.

नवी मुंबईतल्या राजकारणातला सर्वात नावाजलेला चेहरा अशी ख्याती असलेल्या गणेश नाईकांच्या समोर मंदा म्हात्रेंचा काय निभाव लागणार? अश्या चर्चा नवी मुंबईत रंगू लागल्या होत्या. दुसरीकडे नव्याने तयार झालेल्या ऐरोली मतदार संघातून राष्ट्रवादीने गणेश नाईक यांचे धाकटे सुपुत्र संदिप नाईक यांना उमेदवारी देऊ केली. आता पिता-पुत्र दोघेही नवी मुंबईचं भवितव्य ठरवणार अशी नवी मुंबई करांची निश्चिती झाली.

दोन्ही बाजूने जोरदार प्रचार होऊ लागला. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या. बेलापूर पट्टीत गणेश नाईक आणि मंदा म्हात्रेंनी फिरून आपलं प्रस्थ वाढवलं. हळूहळू मतदानाची तारीख जवळ येऊ लागली आणि प्रचाराच्या तोफा मंदावू लागल्या. बघता-बघता मतदान पेटीत बेलापूर मतदार संघाचं भवितव्य बंदिस्त झालं आणि निकाला दिवशी गणेश नाईकांसाठी धक्कादायक निकाल समोर आला.

मंदा म्हात्रे या गणेश नाईक यांच्या विरोधात १५०० हून अधिक मतधिक्यांनी विजयी झाल्या. गणेश नाईक यांच्या पराभवाने राष्ट्रवादीला मोठा झटका बसला. मात्र,यामुळे मंदा म्हात्रेंच्या विजयाच्या चर्चा सर्वत्र ऐकू येऊ लागल्या.

खरंतर प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जवळून पाहणाऱ्या आणि गरीबीची जाण असलेल्या मंदा म्हात्रे यांनी १९९४ ला आपल्या सामाजिक आणि राजकीय कारर्किदीची सुरूवात केली. शरद पवार यांच्या नेतृत्वात नव्यानं स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी प्रवेश करत आपल्या राजकिय कार्याची सुरूवात केली. यावेळी नवी मुंबईत मंदा म्हात्रे यांच्या रूपाने राष्ट्रवादीला खंबीर नेतृत्व करणारी महिला प्रतिनिधी म्हणून मिळाली होती. यामुळे राष्ट्रवादीने त्यांच्यातील नेतृत्व गुण हेरून त्यांना महिला आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पद दिले.

हे पद सांभाळत असताना त्यांनी महिलांचे विभागवार मेळावे घेऊन पक्ष विस्ताराचे मोठे काम केले. प्रकल्पग्रस्तांसाठी विविध आंदोलने असतील किंवा मत्सव्यवसायिकांसाठी आंदोलने करून आपल्या मतदारसंघातील समस्या सोडविण्याचा प्रयत्न असेल, मंदा म्हात्रे यांनी ही समाजकार्याची कामे पुढाकाराने केली. आधी नगरसेवक त्यानंतर सभापती असा सुरू झालेला प्रवास २००४ ला विधान परिषेदेच्या सदस्य निवडीपर्यत येऊन पोहचला.

त्यानंतर राष्ट्रवादीतील गणेश नाईक यांच्या मनमानीचं कारण देत २०१४ साली त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आणि आमदारकीवर आपली मोहोर उमटवली. गणेश नाईक यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतरही संघर्ष करत त्यांनी आपल्या कामाच्या बळावर २०१९ ला तिकीट मिळवलं आणि २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत घवघवीत यश संपादित केलं.

आज भाजपच्या माध्यमातून मंदा म्हात्रे नवी मुंबईत आमदार म्हणून काम पाहतायेत. त्यांचा राजकिय प्रवास हा अनेक संघर्षमय घटनांनी भरलेला आहे. हा प्रवास त्यांच्यातल्या नेतृत्व गुणांची नव्याने ओळख महाराष्ट्राला करून देतोय.

आचार्य नीती

राजकीय, सामाजिक, साहित्यिक आणि अभ्यासपूर्ण माहितीसाठी आचार्य नीती हे सांकेतिकस्थळ सुरु करण्यात आलं आहे. महाराष्ट्रासह देशभरातील विविध घटना,ताज्या घडामोडी यांचे सखोल विश्लेषण तुम्हाला या सांकेतिक स्थळावर वाचायला मिळेल. यामाध्यमातून आम्ही सातत्यापूर्ण आपल्यापर्यंत विश्वासनीय आणि वैचारिक माहिती पोहचवत राहू.आमच्यासोबत जोडले जा आणि अभ्यासपुर्ण माहिती वाचत राहा.
Back to top button

You cannot copy content of this page