सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है ही कविता लिहिणारे थोर क्रांतिकारक पंडित राम प्रसाद ‘बिस्मिल’, वाचा त्यांचा रंजक इतिहास

- है लिए हथियार दुश्मन ताक में बैठा उधर, और हम तैयार हैं सीना लिए अपना इधर। . खून से खेलेंगे होली गर वतन मुश्किल में है, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है। . सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है ही कविता लिहिणारे पंडित राम प्रसाद 'बिस्मिल' यांच्याविषयी जाणून घ्या..
‘सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है’ ही कविता आपल्या सर्वांना ज्ञात आहे.मात्र,हि कविता लिहिणारे महान क्रांतिकारक पंडित राम प्रसाद ‘बिस्मिल’ हे आपल्यातल्या अनेकांसाठी अपरिचित आहे. पण तुम्हाला माहितेय का? राम प्रसाद बिस्मिल यांनी वयाच्या तीसी पर्यंत इंग्रजांविरुद्ध अनेक कविता लिहिल्या. शायरी लिहिल्या. यातून त्यांनी देशभक्तीपर वातावरण निर्मिती केली आणि अनेक पुस्तकं लिहून अवघा देश स्वतंत्र क्रांतीसाठी ढवळून काढला.लिहिलेल्या या पुस्तकांच्या प्रति विकून त्यांनी देश स्वातंत्र्यासाठी हत्यारं विकत घेतली आणि तरुणांना संघटित करून इंग्रजांविरूद्ध बंड पुकारला.क्रांतिकारक पंडित राम प्रसाद बिस्मिल यांच्या याच शौर्याची माहिती आज आपण या लेखातून घेणार आहोत.
साल होतं १९१८ चं.देशात क्रांतीकारी विचारांनी प्रेरित होऊन अनेक देशवीर तरूण भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रज सत्तेविरोधात पेटून उठत होते.त्याचवेळी देशात अनेक क्रांतीकारक आपल्या संघटना मजबूत करून इंग्रजांविरूद्ध अनेक षडयंत्र आखत होते.भारतमातेची इंग्रजांकडून सुटका करणं हे एकमेव उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हे क्रांतिकारक काम करत होते.अश्यात उत्तर प्रदेशमध्ये गेंदालाल दिक्षित यांची शिवाजी समिती क्रांतीकारी चळवळीसाठी नावारूपाला येत होती.मात्र,तोच इंग्रजांनी गेंदालाल दिक्षित यांची हत्या केली.यानंतर पंडित राम प्रसाद बिस्मिल यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी मिळून एक संघटना उभारली आणि त्याला मातृवेदी संघटना असं नावं दिलं.हि संघटना ब्रिटीश विरूद्ध कारवाया करू लागली.हि बाब इंग्रजांच्या निदर्शनास आल्यानंतर इंग्रजांनी पंडित राम प्रसाद बिस्मिल यांच्यासह त्यांच्या साथीदारांना अटक केली आणि त्यांच्या विरूद्ध खटला चालवला.हा खटला मैनपुरी षडयंत्र म्हणून इंग्रजांनी चालवला.यामध्ये पंडित राम प्रसाद बिस्मिल यांच्यासह त्यांच्या साथीदारांना शिक्षा सुनावण्यात आली.त्यांनी यात अनेक वर्ष शिक्षा भोगली.
दरम्यान तुरूंगात सुटल्यानंतर हे क्रांतिकारक शांत होतील असं इंग्रजांना वाटलं होतं. पण असं झालं नाही, या उलट क्रांतीकारकांच्या चळवळी आणखी मोठ्या प्रमाणात वाढल्या.यातच १९२५ ला या क्रांतीकारकांनी मिळून इंग्रज आपल्या देशातून लुटत असलेल्या खजिन्यावर धाड टाकण्याचा प्लॉन बनवला आणि हा प्लॉन यशस्वी देखील करून दाखवला.काकोरीमध्ये रेल्वेची साखळी खेचून रेल्वे थांबवण्यात आली आणि त्यावर रामप्रसाद बिस्मिल,राजेंद्रनाथ लाहीरी, अशफाक उल्ला खां, रोशन सिंह, शचिंद्रनाथ सन्याल, मन्मनाथ गुप्त, मुकुंदीलाल जी, योगेशचंद्र चॅटर्जी, गोविंद चरणकर, राजकुमार सिंग, विष्णुशरण दुल्बिश, रामकृष्ण खत्री, सुरेशचंद्र भट्टाचार्य, रामदुलारे त्रिवेदी, भूपेंद्रनाथ,चंद्रशेखर आझाद या सर्व क्रांतिकारकांनी मिळून धाड टाकली.यातून मिळालेल्या पैशाने स्वातंत्र संग्रामासाठी हत्यारं विकत घेण्याचा या क्रांतिकारकांचा मानस होता.
दरम्यान या काकोरी प्रकारानंतर या क्रांतिकारकांना अटक करण्यात आली.यात सहभाग घेतल्यानं पंडित राम प्रसाद बिस्मिल यांना देखील अटक करण्यात आली आणि यातच दोषी पकडून इंग्रजांनी १९२७ मध्ये बिस्मिल यांना फाशीची शिक्षा सुनावली.यावेळी बिस्मिल यांनी इंग्रजांकडे कोणतीही दया याचना न करता हसत हसत फासावर जाण पसंत केलं आणि १९२७ मध्ये बिस्मिल यांनी देशासाठी शहिदत्व पत्करलं.दरम्यान त्यांनी लिहिलेल्या कवितांनी देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामाला स्फुरण आलं आणि देशासाठी अनेक क्रांतिकारी तरुण मनगट पेटून उठली.यानंतर देशातील क्रांतिकारकांसाठी पंडित राम प्रसाद बिस्मिल हे मिसाल बनले.अश्या आपल्या देशवीरास आचार्यची आदरांजली.