९० टक्के मुंबईकरांना माहित नसलेलं धार्मिक ठिकाण..वाघोलीतील शनि मंदिर

- हे शनी मंदिर धार्मिकदृष्ट्या काहीसं खास आहे. या गावात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला आपलंसं करणारं आणि त्यांना आपल्यामध्ये सामावून घेणारं गावातलं हे शनी मंदिर पर्यटकांसह भाविकांच्या श्रद्धेचं केंद्रस्थान बनलंय. एवढंचं काय तर हे मंदिर पंचक्रोशीत प्रति शनि शिंगणापूर म्हणून देखील प्रसिद्ध आहे.
मुंबईपासून काहीच अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं आणि नालासोपारा या रेल्वे स्थानकापासून अवघ्या दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेलं वाघोली नावाचं गाव आज महाराष्ट्रभर चर्चेचा विषय बनलंय आणि या सर्वामागे एक महत्त्वाचं कारणय ते म्हणजे या गावातलं रेखीव शनि मंदिर.
हे शनी मंदिर धार्मिकदृष्ट्या काहीसं खास आहे. या गावात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला आपलंसं करणारं आणि त्यांना आपल्यामध्ये सामावून घेणारं गावातलं हे शनी मंदिर पर्यटकांसह भाविकांच्या श्रद्धेचं केंद्रस्थान बनलंय. एवढंचं काय तर हे मंदिर पंचक्रोशीत प्रति शनि शिंगणापूर म्हणून देखील प्रसिद्ध आहे.
मंदिरामध्ये प्रवेश करताना आकाशाच्या निळ्या छत्राखाली एका गोलाकार रिंगणाच्या मधोमध हुबेहुब शनी शिंगणापूरसारखीचं स्वयंभू शनीच्या शिळेची प्रतिकृती आहे. या प्रतिकृतीच्या अगदीचं समोर पवनपुत्र हनुमंताची डोळ्यांना प्रसन्न करणारी मुर्ती आहे. भाविकगण सर्वात प्रथम इथेच येऊन स्वहस्ते शनी देवाला तसंच हनुमंताला तेल अर्पण करतात आणि मनातल्या सर्व इच्छा भक्तीभावाने देवाला सांगतात.
विशेष म्हणजे या शनी शिळेला आणि हनुमंताला अर्पण केलं जाणारं हे तेलं मंदिर संस्थानाकडून एकत्र केलं जातं आणि त्यावर व्यवस्थित रिसायकलिंग करून त्यात औषधी वनस्पतींचे अर्क मिसळून हे तेलं मोफत सांधेदुखी किंवा हाडांचा त्रास असलेल्या रुग्णांना मालिशसाठी मोफत दिलं जातं.
भाविक मंदिर परिसरातील शनी शिळा तसंच हनुमंतांचं दर्शन घेऊन पुढे आल्यानंतर त्यांना शनिदेवाची मुर्ती असलेलं प्रशस्त आणि आकर्षक मंदिर दिसतं. उत्तम लाकडीकाम केलेली मंदिराची कौलं आणि त्यांची सुरेख पद्दतीने केलेली रचना भाविकांच्या डोळ्यांना भुरळ पाडते. हे मंदिराचं साग लाकडापासून तयार करण्यात आलेलं कौशल्यपुर्ण बांधकाम पाहून भाविक थेट शनीदेवाच्या मुर्ती समोर उभे राहतात आणि मनमोकळेपणाने शनी देवांना आपल्या डोळ्यात साठवतात.
प्रसन्न मनाने देवाचं दर्शन घेऊन मंदिराबाहेर येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर संस्थानानं विसाव्याची उत्तम व्यवस्था केलीये. यासाठी मंदिराच्या अगदीच समोर प्रशस्त असे ट्री हाऊस तयार करण्यात आले आहे. याचसोबत भाविकांना मंदिर परिसरात झोपाळा गार्डनचा देखील आनंद अनुभवता येतो.
या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात दर शनिवारी होणारा दिपोत्सव. दर शनिवारी मंदिरात होणारा दिपोत्सव पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक वाघोलीत दाखल होतात. दुपारपासून सुरू असलेली दिवे लावणीची लगबग आटपून मंदिर व्यवस्थापन रात्री संपुर्ण मंदिर हजारो दिव्यांनी दिपवून टाकते. दिव्यांची ही रोशनाई येणाऱ्या भाविकांना तेजोमयाची आठवण करून देत त्यांच्या मनाचा ठाव घेते.
या मंदिराला भेट देण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे मंदिर परिसरातील मेजवानी. दोन स्थानिक महिला बचत गटा मार्फेत अस्सल मराठमोळे पदार्थांची मेजवानी इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकांना चाखता येते.लज्जतदार सुक्या चटण्यांपासून ते खमंग खोबऱ्याच्या वड्यांपर्यंत तसंच झुणकाभाकरी,थालीपीठ,बटाटवड्यांपासून ते आळूवड्यांपर्यंत साऱ्यांची चव खवय्यांना ईथे चाखता येते.
तर मंडळी, रोजच्या धाकधुकीतून काहीसा विसावा अनुभवण्यासाठी इथे येण्याचा विचार नक्की करा आणि आपल्या कुंटुंबासह इथे एखादा विकेंड नक्की घालवून पाहा…कारण थकलेल्या शरीराने येणाऱ्या प्रत्येकाला सकारात्मकतेची उर्जा देण्याचं काम हे मंदिर मोठ्या अभिमानाने करतंय.