आपल्या बापाच्या अपमानाचा बदला घेत विठ्ठाबाईंनी अवघ्या ११ व्या वर्षी समोरच्या फडाला चितपट केलं होतं

थोडक्यात
  • महाराष्ट्राला लावणीची फार मोठी परंपरा आहे. ही परंपरा आजवर अनेक दिग्गज लोककलावंतांनी प्राणपणाने जपलेय.आम्ही आज तुम्हाला असाच एक किस्सा सांगणार आहोत,जो विठाबाई नारायणगावकर यांच्या संदर्भातील आहेत.

महाराष्ट्राला लावणीची फार मोठी परंपरा आहे. ही परंपरा आजवर अनेक दिग्गज लोककलावंतांनी प्राणपणाने जपलेय. ही परंपरा जपत असताना अनेकदा या लोककलावंतांमध्ये प्रतिष्ठेच्या लढती देखील झालेल्या आहेत.दरम्यान या लढती सवाल-जवाबाच्या सामन्यातून प्रेक्षकांसमोर आणल्या जात आणि यातून हारजीतेचा फैसला केला जात. आम्ही आज तुम्हाला असाच एक किस्सा सांगणार आहोत,जो विठाबाई नारायणगावकर यांच्या संदर्भातील आहेत.

हा किस्सा आहे सन १९४६ सालचा. कराड तालूक्यातील गोळेगांव मुक्कामी त्यावेळचे नावाजलेले दोन फड समोरासमोर ‘सामन्या’साठी ऊभे ठाकले होते. एक फड होता भाऊ अकलेकरांचा. तर दुसरा होता भाऊ नारायणगांवकरांचा. या दोन्ही फडांची सवालजवाबातील जुगलबंदी पाहण्यासाठी हजारोंचा जनसमुदाय गोळेगांवात जमला होता. मात्र,केवळ तमाशात ‘स्त्रिनर्तीका’ नाही म्हणून कै.भाऊ नारायणगावकरांना या सामन्यामध्ये हार पत्करावी लागली होती.

ऊभ्या महाराष्ट्रात भाऊ नारायणगावकरांनी आत्तापर्यंत हार पाहिलीच नव्हती.हा अपमान भाऊंच्या जिव्हारी लागला होता. त्यावेळी भाऊ नारायणगावकरांची मुलगी ‘विठा’ हि कै.मामा वरेरकरांच्या कलापथकात, मुंबईमध्ये काम करीत होती. स्वत: भाऊंनीच तिची अभिनयातील निपुणता वाढवण्यासाठी मामा वरेरकरांच्या विनंतीला मान देऊन तिला तेथे ठेवली होते.

सामन्यातली हार जिव्हारी लागल्यानं भाऊंनी त्याच रात्री मुंबई गाठली व झाला प्रकार ‘विठा’ला सांगितला.हा प्रकार ऐकताच वाघिणीसारखी ‘विठा पेटून उठली व जन्मदात्या बापाच्या अपमानाचा सुड घेण्यासाठी, आपल्या वडिलांबरोबर दुसऱ्याच दिवशी ‘गोळेगांव’ला आली. त्याच रात्री तिथेच पुन्हा ‘सामना’सुरू झाला.

भाऊ अकलेकर व भाऊ नारायणगांवकर या मातब्बरांचा सामना पाहण्यासाठी अवघा ‘कराड’ तालूका मोठ्या संख्येने लोटला होता.अनेक सवाल-जवाब झाले, पण कोणीही माघार घ्यायला तयार घेत नव्हते. रात्र सरत चालली होती.आणि पहाटेच्या ऊगवत्या ‘शुक्रचांदणी’ बरोबरच,विठा पहिल्यांदाच वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी बापासाठी पायऱ्यांना नमस्कार करून ‘बोर्डा’वर उभी राहिली,

समोर बसलेल्या हजारोंच्या जनसमुदायास ‘मुजरा’ करून ‘विठा’ने पहिलाच सवाल आकलेकरांच्या ‘शेवंता’स विचारला…

‘पुरूष समागम थेंबापोटी नार होतसे गरवार’
‘परी नराश्रूच्या थेंबापोटी नार कोण ती गरवार?’

आणि विठाच्या पहिल्याच सवालाने शेवंताची ‘दातखिळ’च बसली. तिच्याकडेच काय ,पण तिच्या बापाकडे,अकलेकराकडे देखील या सवालाचे उत्तर नव्हते.नियमाप्रमाणे शेवटी विठानेच उत्तर दिले…

‘रम्य वनी हो रसक्रिडेत नारायण ते रमले गं’..
‘प्रणयाचे ते कर्म देवाचे चोरून ‘मोरा’ने पाहीले गं’.
‘मोराच्या या दुष्क्रुत्याने देव तयावर कोपले गं’…
‘प्रणयाचे हे भाग्य तुजला नाही मिळणार वदले गं’…

मोराला शाप देताच वंशविस्तारासाठी मोर गयावया करू लागला! तेव्हा देवाला दया येऊन, मोराच्या ‘प्रणयविरहीत’ वंशविस्तारासाठी त्याने मोराला ‘उ:शाप’ दिला…

“गरजतील मेघ जेव्हा नभाला…करशील आकांत बघून मेघाला…अश्रू नेत्रांची गळतील भुईला..गिळताच ती भार्या तुझी देईन जन्म पिलाला…!!!

आणि हजारो जनसमुदायासमोर फक्त ‘विठा’च जिंकली होती व तेही जन्मदात्या बापाच्या अपमानाचा बदला घेऊन! तेही पहिल्याच सलामीला..यानंतर सुमारे अर्धशतक विठाबाईंनी महाराष्ट्र हलवला, झुलवला, खुलवला व फुलवला देखील..यानंतर विठाबाईंनी नाटक, सिनेमा यामधून देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला..आणि महाराष्ट्राच्या हृद्यात हक्काचं स्थान निर्माण केलं.

संदर्भ-बाबाजी कोरडे, राजगुरूनगर

समाधान जाधव

कु.समाधान जाधव चालू घडामोडी तसंच विविध विषयांवर आपल्या लेखनीच्या माध्यमातून प्रखरपणे भाष्य करणारे पत्रकार. समाधान यांनी महाराष्ट्रातील नावाजलेल्या वृत्तवाहिनीसोबत प्रदीर्घ काळ काम केले आहे. तसंच महाराष्ट्रभरात विविध विषयांवर जवळपास दिडशेहून अधिक व्याख्याने देखील सांगितली आहेत.
Back to top button

You cannot copy content of this page