…म्हणून मंत्रीपदाची ऑफर नाकारून दादा कोंडकेंनी शिवसैनिक राहणंच पसंत केलं

- अखेर निकालाचा दिवस उजाडला आणि या निवडणुकीचा निकाल काँग्रेससाठी धक्कादायक लागला. काँग्रेसी सरकारला मराठी जनतेने झुगारत युतीच्या पारड्यात बहुमत टाकलं होतं आणि अखेर बाळासाहेबांचं विधानभवनावर भगवा फडकवण्याचं स्वप्न पूर्ण झालं होतं.
हा किस्सा आहे १९९५ सालचा. बाबरी पतन आणि मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट यांसारख्या घटनांनी महाराष्ट्रात काँग्रेसी सरकार विरोधातला जनतेचा असंतोष वाढला होता. अश्यातच विधानसभेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आणि शिवसेनेनं प्रचारासाठी आपली कंबर कसली.
बाळासाहेब स्वतः शिवसेना उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत प्रचाराच्या रिंगणात उतरले होते आणि बाळासाहेबांसोबत स्टार प्रचारक म्हणून दादा कोंडकेंनी सुद्धा आपला जलवा दाखवायला सुरुवात केली होती.
दादा कोंडके म्हणजे निव्वळ फटकेबाजी हे समीकरण भाषण ऐकायला बसलेल्या सर्वांना माहीत असायचं. दादांनी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या विरोधात जोरदार टोलेबाजी करत काँग्रेस विरोधातल्या संपूर्ण असंतोषी वातावरणात तेल ओतलं होतं.
बघता-बघता बाळासाहेबांची आणि दादा कोंडकेंची तोफ महाराष्ट्रभर धडधडायला लागली होती आणि त्यांनी महाराष्ट्रात काँग्रेस आणि शरद पवार यांच्या विरोधात धुरुळा उडवून दिला होता.
अखेर निकालाचा दिवस उजाडला आणि या निवडणुकीचा निकाल काँग्रेससाठी धक्कादायक लागला. काँग्रेसी सरकारला मराठी जनतेने झुगारत युतीच्या पारड्यात बहुमत टाकलं होतं आणि अखेर बाळासाहेबांचं विधानभवनावर भगवा फडकवण्याचं स्वप्न पूर्ण झालं होतं.
आता या सरकारचा मुख्यमंत्री कोण होणार? कोणाला कोणतं मंत्रीपद मिळणार? या सर्वांवर चर्चा करायला बाळासाहेबांनी मातोश्रीवर बैठक बोलावली.या बैठकीला शिवसेनेचे सर्व नेते जातीने हजर होते. सोबतच दादा कोंडकेंनाही आमंत्रण देण्यात आलं होतं.
अखेर बाळासाहेब आले आणि बैठकीला सुरुवात झाली. बाळासाहेबांनी समोर बसलेल्या दादांना पहिला प्रश्न केला. ‘बोला दादा तुम्हाला कोणतं पद हवं?’
बाळासाहेबांच्या या प्रश्नांने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण बाळासाहेबांनी खरोखरच दादांना मंत्रीपदाची ऑफर देऊ केली होती. बाळासाहेबांना दादा कोंडके मंत्री पदी विराजमान झालेले पाहायचे होते.वकारण बाळासाहेब कलेचा आणि कलाकाराचा सन्मान करत होते.
मात्र,दादांना माहीत होतं, सक्रिय राजकारणी झालो तर जनता माझ्यातल्या कलाकारावर निस्सीम प्रेम करणार नाही. म्हणूनच दादांनी बाळासाहेबांना प्रतिप्रश्न केला,
‘साहेब, तुम्ही कोणतं पद घेणार?’
बाळासाहेब म्हणाले, मी शिवसेनाप्रमुखच राहणार आणि सत्तेचा रिमोट माझ्या हातात ठेवणार!
यावर क्षणाचाही विलंब न करता दादा उच्चारले, ‘तुम्ही शिवसेनाप्रमुखच राहणार असाल तर मी ही शिवसैनिकच राहीन. हे पद माझ्यासाठी लाख मोलाचं आहे. या व्यतिरिक्त मला दुसरं कोणतंही पद नको’.
दादांचं हे वाक्य ऐकून उपस्थित प्रत्येकजण आश्चर्यचकीत झाला आणि दादांवर कौतुकाचा वर्षाव करू लागला. दादांना आपल्या ‘एकटा जीव सदाशिव’ या आत्मचरित्रात हा किस्सा सांगितलाय.