अश्या ही काही गीता ज्या भगवान श्री कृष्णाने सांगितल्याच नाहीत…

भगवत गीतेमध्ये जीवनाचे संपूर्ण सार सांगितलं गेलंय. ज्यामध्ये कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग या सर्व शिकवणींचा समावेश केला गेलाय.असं म्हटलं जातं कि भगवान श्री कृष्णाने कुरूक्षेत्रामध्ये अर्जूनाला जो उपदेश केला तो गीतेच्या माध्यमातून सर्वांच्या समोर आला. मात्र,ही गीता फक्त श्री कृष्णानेच सांगितली असं नाही तर यामागेही अश्या अनेक गीता ज्या श्री कृष्णाने न सांगताही आजच्या हिंदू समाजात दृढ झाल्या आहेत. चला तर मग याच गीतांविषयी जाणून घेऊयात..

१.अवधूत गीता– गुरु दत्तात्रय यांनी अवधूत गीता सांगितलेली आहे.म्हणून ह्या गीतेला दत्तात्रय गीता, वेदांत सार किंवा अवधूत ग्रंथ असं म्हटलं जातं. ज्या व्यक्तीला मोक्षप्राप्ती झालेली असते त्याबद्दल गुरु दत्तात्रय यांनी या गीतेत अनेक खुलासे केलेले आहेत. ही सुद्धा जगण्याचं सार सांगणारी एक गीताच आहे.

२.गुरु गीता– ही गीता स्कंदपुराणमध्ये आढळते. या गीतेत उपदेश देणारे भगवान शिव आहेत आणि प्रश्नकर्ता त्यांची शक्ती देवी पार्वती आहे.गुरु गीतेत महादेवांनी एक गुरु कसा असतो, त्याची आराधना आणि भक्ती कशी करावी ह्याबद्दल देवी पार्वतीला उपदेश दिलेले आहेत.

३.गणेश गीता – ही गीता गणेश पुराणामधील आहे. श्रीगणेश यांना वरेण्यं राजाने अगदी तसाच प्रश्न विचारला जसा प्रश्न भगवत गीतेत अर्जुनाने विचारला होता. तो ऐकून श्रीगणेश यांनी आपले स्वतःचे विराट रूप वरेण्यं राजाला दाखवले आणि त्याला जीवनाबद्दल उपदेश दिले. हा संवाद श्रीगणेश आणि वरेण्यं राजादरम्यान झालाय. ज्याला गणेश गीता असं म्हणतात.

४.व्याध गीता– महाभारतातील ‘अरण्य पर्वा’मध्ये ही गीता आढळते. पांडवांनी १२ वर्षाचा वनवास सुरु केला तेव्हा युधिष्ठिरला मार्कंडेय ऋषींनी ही गीता सांगितली. व्याधचा अर्थ शिकार करणारा किंवा कसाई असा होतो. मात्र, इथे एक संन्यासी, ज्ञान मिळवण्यासाठी अशाच एका ‘शिकारी-कसाई’ कडे जातो. व्याध गीता त्या संन्यासी आणि व्याधमधला संवाद आहे. हा संवाद मार्कंडेय ऋषींनी वनवासादरम्यान युधिष्ठिरला सांगितलेला आहे.

५.उद्धव गीता – सुरुवातीपासूनच उद्धव हे श्रीकृष्णाचे सारथी असतात. जेव्हा श्रीकृष्णाचे मनुष्य अवताराचे ध्येय साध्य पुर्ण होते. तेव्हा ते पुन्हा वैकुंठाला जायचं निश्चित करतात. यावेळी ते उद्धवाला जवळ बोलावतात आणि म्हणतात की, ‘माझ्या पूर्ण जीवनकाळात माझ्याकडून काहीच न मागता तू माझी सेवा केली आहेस. तुला जे हवे आहे ते माग’, त्यावर उद्धव आपली शंका बोलून दाखवतो. तो म्हणतो, ‘तुम्ही ह्या जीवनकाळात अनेक गोष्टी केल्या. तुमचे उपदेश आणि तुमचे वैयक्तिक जीवन हे वेगळे होते. मला ह्याबद्दल ज्ञान आणि उपदेश द्या!’, त्यावरून मग श्रीकृष्ण आणि उद्धवमध्ये जो संवाद झाला तो ‘उद्धव गीता’ म्हणून ओळखला जातो.

६.अनुगीता– अनुगीता ही महाभारताच्या ‘अश्वमेधिक पर्वा’वर आधारित आहे. जेव्हा कुरुक्षेत्राचे युद्ध संपवून जेष्ठ पांडव युधिष्ठिरचा राज्यभिषेक होत असतो तेव्हा भगवत गीतेत सांगितलेलं गहन तत्वज्ञान इथे चर्चिले जातं.हे तत्वज्ञान अनुगीतेच्या माध्यमातून संपादित केलं गेलंय.दरम्यान श्रीकृष्ण आणि अर्जुनमध्ये झालेला संवाद या गीतेत लिहीला गेलाय.त्यामुळेच अनुगीतेला आपण श्रीमद् भगवत गीतेची एकसारखी प्रत म्हणू शकतो.

अश्या अनेक गीता आहेत ज्या श्री कृष्णाने सांगितल्या नसल्या तरी गीता म्हणूनच ओळखल्या जातात.यामध्ये राम गीता, वशिष्ठ गीता, उत्तर गीता, सुत गीता, सृती गीता, संपक गीता, मानकी गीता अशा अनेक गीतांचा समावेश होतो.

आचार्य नीती

राजकीय, सामाजिक, साहित्यिक आणि अभ्यासपूर्ण माहितीसाठी आचार्य नीती हे सांकेतिकस्थळ सुरु करण्यात आलं आहे. महाराष्ट्रासह देशभरातील विविध घटना,ताज्या घडामोडी यांचे सखोल विश्लेषण तुम्हाला या सांकेतिक स्थळावर वाचायला मिळेल. यामाध्यमातून आम्ही सातत्यापूर्ण आपल्यापर्यंत विश्वासनीय आणि वैचारिक माहिती पोहचवत राहू.आमच्यासोबत जोडले जा आणि अभ्यासपुर्ण माहिती वाचत राहा.
Back to top button

You cannot copy content of this page