बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेतील ते शेवटचे क्षण… वाचा सविस्तर

- सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही वार्ता बाबासाहेबांच्या निकटवर्तीयांच्या लक्षात आली आणि त्यांना धक्का बसला.हळूहळू हि वार्ता वाऱ्यासारखी देशभर पसरली आणि बाबासाहेबांच्या निधनानं संपूर्ण देश हळहळला.
आपलं संपुर्ण आयुष्य ज्यांनी शोषित आणि वंचितांच्या हक्कांसाठी खर्ची घालवलं,शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असं म्हणत ज्यांनी वंचितांचं संघटन उभारलं. स्त्रीला स्त्री म्हणून जगण्याचा ज्यांनी हक्क मिळवून दिला. तसंच कामगारांच्या घामाला ज्यांनी योग्य ते मोल मिळवून दिलं त्या महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिन.
आजच्याच दिवशी ६६ वर्षांपूर्वी आपल्या सर्वांना सोडून बाबासाहेब अनंताच्या प्रवासाला निघून गेले
नेहमी सारखाच शांततेतला तो दिवस होता. रोजच्या वाचन-लिखाणातून वेळ काढून बाबासाहेबांनी रात्रीचं जेवण केलं आणि दमलेल्या शरीराने ते आपल्या बेडवर विसावले.
बेडकडे जाण्यापुर्वी त्यांनी ‘दि बुद्धा अँड हिज धम्मा’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेच्या पानावर अखेरची नजर फिरवली आणि ते शांततेत झोपी गेली.ही रात्र बाबासाहेबांच्या आयुष्यातली अखेरची रात्र ठरली.शांत झोपेत असताना याच रात्री त्यांचं महानिर्वाण झालं.
सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही वार्ता बाबासाहेबांच्या निकटवर्तीयांच्या लक्षात आली आणि त्यांना धक्का बसला.हळूहळू हि वार्ता वाऱ्यासारखी देशभर पसरली आणि बाबासाहेबांच्या निधनानं संपूर्ण देश हळहळला. दिल्लीतल्या २६, अलिपूर रोड या निवासस्थानी बाबासाहेबांचं डोळे भरून अखेरचं दर्शन मिळावं यासाठी त्यांच्या अनुयायांनी मोठी गर्दी केली होती.यावेळी पंडीत जवाहरलाल नेहरूंसह दिल्लीतील सर्व मंत्र्यांनी बाबासाहेबांच्या निवासस्थानाकडे धाव घेतली आणि बाबासाहेबांना अखेरची मानवंदना दिली.

तिथून त्यांचं पार्थिव नागपूर मार्गे मुंबईत आणलं गेलं.बाबासाहेबांचं पार्थिव मुंबईत आल्यानंतर प्रचंड गर्दीने सांताक्रूझ विमानतळाबाहेर भावनिक वातावरण तयार झालं.काही काळ मुंबईत त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आल्यानंतर त्यांची अंत्ययात्रा निघाली आणि या अंत्ययात्रेला ‘न भूतो न भविष्यति’ अशी गर्दी जमली.लाखोंच्या संख्येत बाबासाहेबांना शेवटचा निरोप देण्यासाठी लोक आले होते. अनुयायांच्या हुंदक्यांच्या टाहोनं मुंबापुरीचा पुर्ण आसमंत व्यापला गेला होता.मुंबईमधील दादर येथील चैत्यभूमीपर्यंत बाबाबासाहेबांची अंत्ययात्रा काढण्यात आली आणि याच ठिकाणी शासकिय इतमामात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अखेरची मानवंदना देण्यात आली.
आपलं संपुर्ण आयुष्य देशहितासाठी झटणाऱ्या,वंचितांना आपला हक्क मिळवून देणाऱ्या आणि माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणाऱ्या अश्या या व्यक्तीमत्त्वाला आचार्यची विनम्र वंदना!