मावळ्यांचा नेमका पोशाख होता तरी कसा?,वाचा सविस्तर माहिती

थोडक्यात
  • दरम्यान, या सिनेमांमधून मराठा मावळ्यांची जी प्रतिमा प्रेक्षकांना दाखवली जाते ती प्रतिमा खरंच योग्य आहे का?, मावळ्यांचा पोशाख एका सिनेमामध्ये वेगळा आणि दुसऱ्या सिनेमामध्ये वेगळा का दाखवला जातो?, मावळ्यांचा नेमका पोशाख होता तरी कसा? असे एक ना अनेक प्रश्न आपल्याला भेडसावत असतात.

‘मराठा तितुका मेळवावा,महाराष्ट्र धर्म वाढवावा’, असं म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराजाचं तोरण बांधलं. आपल्या अफाट शौर्यातून त्यांनी महाराष्ट्रातील मराठी मनगटं एक केली आणि इथल्या भूमीपुत्रांना आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी उभं केलं. या वीर मराठी मावळ्यांनी गनिमी काव्याच्या बळावर आपलं स्वराज्य शत्रूच्या नजरेतून आबाधित ठेवलं आणि रयतेच्या मनातलं राज्य स्थापून शिवाजी महाराज छत्रपती झाले.

याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यावर आधारित अनेक सिनेमे आता येऊ लागलेत. या सिनेमांमधून महाराजांचा प्रेरणादायी इतिहास प्रेक्षकांसमोर उलगडला जात आहे. मात्र,या सिनेमांमधून मूळ इतिहासाला कुठंतरी धक्का लागतोय, असा आरोप देखील केला जाऊ लागला आहे.

अश्यात महेश मांजरेकर यांनी आपल्या आगामी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या सिनेमाची घोषणा केली आहे. या सिनेमात महेश मांजरेकर यांनी सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्यासह वीर सहा मावळ्यांनी नेसरीच्या खिंडीत गाजवलेला पराक्रम दाखवला आहे.अश्यात या सिनेमाच्या पोस्टर लॉंचिंगचा सोहळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला आहे. यावेळी महेश मांजरेकरांनी या सिनेमाची स्टार कास्ट माध्यमांसमोर पोशाखासहित जाहीर केली आणि यानंतर यावर महाराष्ट्रभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या.

या सिनेमाच्या पोस्टरमध्ये दाखवण्यात आलेल्या मावळ्यांच्या पोशाखावर तसंच केसभूषेवर शिवप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. माजी खासदार संभाजी छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेत या सिनेमांविरोधात आपलं आक्रमक मत व्यक्त केलं आहे.

दरम्यान, या सिनेमांमधून मराठा मावळ्यांची जी प्रतिमा प्रेक्षकांना दाखवली जाते ती प्रतिमा खरंच योग्य आहे का?, मावळ्यांचा पोशाख एका सिनेमामध्ये वेगळा आणि दुसऱ्या सिनेमामध्ये वेगळा का दाखवला जातो?, मावळ्यांचा नेमका पोशाख होता तरी कसा? असे एक ना अनेक प्रश्न आपल्याला भेडसावत असतात.

आपण आज याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. छत्रपती शिवरायांच्या वीर मराठी मावळ्यांच्या याच पोशाखाची माहिती घेणार आहोत.

कसा होता मावळ्यांचा पोशाख?

महाराष्ट्रावर मध्ययुगीन कालखंडात जवळपास पाच पातशाह्या राज्य करत होत्या. आदिलशाही, निजामशाही, मुघल, पोर्तुगीज, इंग्रज यांनी आपआपली सेना हिंदूस्थानात उभी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. अश्यात आपल्या मातृभूमीला वाचवण्यासाठी शिवरायांनी देखील आपली सेना उभारण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार पाऊलं उचलायला सुरूवात केली होती.

दरम्यान स्वत:ची सेना उभारणं हि काही सोपी गोष्ट नव्हती. महाराजांच्या समोर भली मोठी आव्हानं आव वासून उभी होती. अश्यात महाराजांनी सेना बांधणीचं आव्हान स्वत:च्या खांद्यावर लिलया पेललं आणि कुशल सवंगडी जमवून आपलं सैन्य उभं केलं.

हे सैन्य उभं करत असताना या सैन्याचा महाराजांनी अभ्यासपुर्वक पोशाख ठरवला. युद्ध लढताना पोशाखामुळे कुठे अडचण येवू नये याची देखील महाराजांनी काळजी घेतली होती.

महाराष्ट्राच्या मावळ मातीत झुंझणाऱ्या या वीर मावळ्यांना अंगावर परिधान करण्यासाठी नीम सफेद म्हणजेच काहीसा मळखाऊ रंगाचा सदरा असायचा. सह्याद्रीच्या मातीत लढाई लढताना हा सदरा कुठेही जास्त अस्वच्छ होऊ नये यासाठी हा रंग ठरवताना काळजी घेण्यात आली होती.

दुसरीकडे मळखाऊ रंगाचाच पण गुडघ्यापर्यंत येईल असा पायजमा मावळ्यांसाठी पोशाखात असायचा. हा पायजमा गुडघ्यापर्यंतच असल्याने लढाई लढताना किंवा धावताना त्याचा त्रास मावळ्यांना होत नसे आणि सोईस्कररित्या चपळाईने हालचाल करता येत असे. दुसरीकडे मुघलांच्या पोशाखातील पायजमा हा काहीसा ढगळा असल्याने मुघली सैन्य अनेकदा अडचणीत येत असे.

डोक्यावरील मराठी पगडी

महाराजांच्या सैन्यात विविध तुकड्या होत्या. या तुकड्या सागरी मार्ग, डोंगरदऱ्या, गुप्तहेरी, राखीव सेना अश्या विविध घटकांमध्ये विभागण्यात आल्या होत्या. या सर्व तुकड्यांचे सेनापती, स्वराज्याचे सुभेदार, मंत्री मंडळातील प्रधान यांचा पोशाख मावळ्यांसारखाच होता. मात्र, त्यांच्या डोक्यावर असलेली शुभ्र लाल रंगाची मराठी चंद्रकोरी पगडी ही विशेष असायची.

या पगडीवर एखादं मानचिन्ह असायचं. त्याला एका कोपऱ्यात मोत्यांची नक्षी असायची. बाकी सर्व सैन्यातील मावळ्यांना एक समान अर्ध चंद्रकोरीसारखी शुभ्र लाल रंगाची मराठी पगडी असायची. युद्धाच्या वेळी ही पगडी पडू नये म्हणून लाल रंगाच्या शेल्याने बांधली जायची. या पगडीच्या बाहेर डोक्यावरील केस येऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जात होती.

तसंच कंबरेला देखील शेला गुंडाळलेला असायचा. पायात काट्याकुट्यातून चालताना जखमा होवू नये म्हणून चमड्याच्या चप्पला असायच्या. तर असा हा मराठी मावळ्यांचा पोशाख रूबाबदारपणे वटायचा.

आचार्य नीती

राजकीय, सामाजिक, साहित्यिक आणि अभ्यासपूर्ण माहितीसाठी आचार्य नीती हे सांकेतिकस्थळ सुरु करण्यात आलं आहे. महाराष्ट्रासह देशभरातील विविध घटना,ताज्या घडामोडी यांचे सखोल विश्लेषण तुम्हाला या सांकेतिक स्थळावर वाचायला मिळेल. यामाध्यमातून आम्ही सातत्यापूर्ण आपल्यापर्यंत विश्वासनीय आणि वैचारिक माहिती पोहचवत राहू.आमच्यासोबत जोडले जा आणि अभ्यासपुर्ण माहिती वाचत राहा.
Back to top button

You cannot copy content of this page