सावित्रीमाईंचं नेमकं शिक्षण काय झालेलं?

थोडक्यात
  • सावित्रीमाईंनी शिक्षिका म्हणून आवश्यक असलेलं सर्व प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पुण्यातील एका वास्तूत मुलींना शिकवायला सुरुवात केली. या कामांमध्ये त्यांना सगुणाबाई यांनी मदत केली. यानंतर या फुले दामप्त्यांनी भिडे वाड्यात स्वतःची मुलींची पहिली शाळा सुरू केली. सावित्रीमाईं शिकवत असलेल्या शाळेच्या अभ्यासक्रमात पारंपारिक विषयांसोबत पाशात्य विषयही घेण्यात आले होते. यात गणित, विज्ञान तसंच सामाजिक शास्त्र या विषयांचा देखील समावेश करण्यात आला होता.

आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतेय.प्रत्येक क्षेत्रात स्त्रीने स्वत:ला सिद्ध करत आपलं अस्तित्व दाखवून दिलं आहे. चूल आणि मुल या चौकटीत न राहता आता स्त्रीयाही अवकाश भरारी घेत आहेत. मात्र,हे कुणामुळे शक्य झालं? स्त्रीला परंपरागत जखडलेल्या बेड्यातून मुक्त करत नवसंजीवनी कुणी दिली? स्त्रीला ज्ञानाची कवाडं कुणी खोलून दिली? या सर्व प्रश्नांचं एकच उत्तर आहे ते म्हणजे सावित्रीबाई फुले.

सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे आणि याच निमित्ताने आपण सवित्रीमाईंच्या जीवनावर प्रकाश टाकणार आहोत.याच माध्यमातून सावित्रीमाईंचं नेमकं शिक्षण काय झालेलं याची देखील माहिती या लेखातून घेणार आहोत.

सावित्रीमाईंनी स्वत: पहिल्यांदा जोतीरावांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाचे धडे गिरवले. त्यानंतर फुले दामप्त्यांनी एकत्र येऊन पुण्यातील भिडे वाड्यात ३ जानेवारी १८४८ ला म्हणजेच सावित्रीमाईंच्या वाढदिवसादिवशी मुलींसाठीची पहिली शाळा सुरू केली. यावेळी शिक्षिकेच्या भूमिकेत येत मुलींसाठी ज्ञानाचा दिवा प्रज्वलित करण्याचं काम सावित्रीमाईंनी केली आणि त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका झाल्या.

सावित्रीमाईंनी शिक्षिका होण्यापूर्वी आपलं सर्व शिक्षण आधी पुर्ण केलं. हे शिक्षण पुर्ण करत असताना सर्वात आधी ज्योतिरावांकडून त्यांनी प्राथमिक शिक्षणाचे धडे घरीच घेतले.नंतर पुढील शिक्षण ज्योतिरावांचे मित्र सखाराम यशवंत परांजपे आणि केशव शिवराम भावलकर यांनी सावित्रीमाईंना दिले. सावित्रीमाईंनी पुढे जाऊन दोन शिक्षक होण्याच्या कोर्सचा सुद्धा अभ्यास केला.

यामध्ये पहिली संस्था अहमदनगर येथील अमेरिकन मिशनरी सिंथिया फरारने चालवलेली संस्था होती.या संस्थेतून त्यांनी शिक्षिका होण्यासाठी लागणाऱ्या सर्व विषयांची सखोल माहिती घेतली व त्याचा अभ्यास केला. यानंतर त्यांनी पुण्यातील एका शाळेत गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांचा अभ्यास केला.या दोन्ही संस्थांमध्ये शिक्षण घेत असताना सावित्रीमाईंनी पारंपारिक विषयांसोबत पाशात्य विषय देखील हाताळले आणि यानंतर त्यांनी ज्ञानार्जनाचं मोठं कार्य हाती घेतलं.

सावित्रीमाईंनी शिक्षिका म्हणून आवश्यक असलेलं सर्व प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पुण्यातील एका वास्तूत मुलींना शिकवायला सुरुवात केली. या कामांमध्ये त्यांना सगुणाबाई यांनी मदत केली. यानंतर या फुले दामप्त्यांनी भिडे वाड्यात स्वतःची मुलींची पहिली शाळा सुरू केली. सावित्रीमाईं शिकवत असलेल्या शाळेच्या अभ्यासक्रमात पारंपारिक विषयांसोबत पाशात्य विषयही घेण्यात आले होते. यात गणित, विज्ञान तसंच सामाजिक शास्त्र या विषयांचा देखील समावेश करण्यात आला होता.

यावेळी त्यांनी समाजातील अनेक मुलींना शाळेत येण्याचं आवाहन केलं. मात्र,या आवाहनाला तत्कालिन समाजाने गाभीर्यानं घेतलं नाही.यातून वंचित समाजातील नऊ जातीतील मुलींना सोबत घेऊन सावित्रीमाईंनी आणि जोतीरावांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि इथून नव्या क्रांतीला सुरूवात झाली.१८५१ मध्ये सावित्रीबाई आणि ज्योतिरावांनी मुलींसाठी पुण्यामध्ये तीन शाळा चालू केल्या. या तीन शाळांमध्ये अंदाजे दीडशे विद्यार्थिंनी होत्या. अभ्यासक्रमाप्रमाणे या तिन्ही शाळांमध्ये शिकवण्याची पद्धती ही सरकारी शाळांपेक्षा वेगळी होती आणि याच पद्धतीमुळे फुलेंच्या शाळांमध्ये सरकारी शाळांपेक्षा मुलींची उपस्थिती जास्त होती.

पण हे स्त्री शिक्षणाचं कार्य वाटत होतं तितकं सोपं नव्हतं. सावित्रीमाईंच्या समोर अनेक मोठी सामाजिक आव्हानं आ वासून उभी होती. अश्यात तत्कालिन समाज व्यवस्थेने स्त्रीला घराच्या जबाबदारीच्या चौकटीत बंद केल्यामुळे फुले दामप्त्यांच्या स्त्री शिक्षणाच्या संकल्पनेला मोठा विरोध होऊ लागला. पुरूषप्रधानतेने बरबटलेल्या तत्कालिन समाजाला स्त्री शिक्षण हि संकल्पना न पटणारी होती. त्यामुळे या संकल्पनेला कडकडून विरोध होऊ लागला.

पाहता-पाहता हा विरोध एवढा तीव्र झाला की,जोतीराव आणि सावित्रीमाईंवर दगड-धोंडे,शेणाचे गोळे फेकले जाऊ लागले.फुले दामप्त्यांविरोधात शिव्या-शापांची मालिका सुरू झाली.मात्र,अश्या परिस्थितीतही न डगमगता या फुले दामप्त्यांनी स्त्री शिक्षणाचं व्रत कायम ठेवलं.एवढंच नाही तर स्त्री शिक्षण तसंच सर्व मुलां-मुलींसाठी समान शिक्षण पद्धत लागू व्हावी यासाठी कायदा तयार करण्याची मागणी फुलेंनी तत्कालिन ब्रिटीश सरकारकडे केली.सर्व परिस्थितीतून स्वत:ला आणि आपल्या घराला सावरत या फुले दामप्त्यांनी शिक्षणासाठी समाज व्यवस्थेची कडवी झुंज दिली आणि आपल्या शाळेत आलेल्या पहिल्या नऊ विविध जातीच्या मुलींना शिक्षणाचे धडे दिले.

या नऊ विविध जातीतील मुलींमध्ये क्रातिकारक लहुजी साळवे यांची कन्या देखील होती.तीचं नाव होतं मुक्ता साळवे.मुक्ताने फुले दामप्त्यांकडून शिक्षणाचे धडे गिरवले आणि याच जोरावर तीने तिसऱ्या इयत्तेत असताना वयाच्या १४ व्या वर्षी पहिला निबंध लिहिला. या निबंधात मुक्तानं तत्कालिन समाज व्यवस्थेत अश्पृश्यांना मिळणाऱ्या वागणूकीबाबत आपल्या भावना मांडल्या. या निबंधासाठी मुक्ता साळवेंचा पुण्यातील विश्रामबागवाड्यामध्ये तत्कालीन कलेक्टरच्या पत्नी मिसेस जोन्स ह्यांच्यामार्फत सत्कार करण्यात आला.

सावित्रीमाई या स्वत: शिक्षिका होत्या.मात्र या व्यतिरिक्त त्या प्रतिभावंत कवियत्री आणि समाजसुधारकही होत्या.त्यांनी शेवटच्या श्वासापर्यत समाजाची सेवा केली.यातून त्यांनी समाजाला प्रगतीवर नेण्याचं आणि अनेक पिढ्यांना ज्ञानानं समृद्ध करण्याचं काम केलं. खरंतर आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री ही टॉपला आहे याचं सर्व क्रेडीट हे या फुले दामप्त्याचं आहे.

आजच्या दिनी स्त्री शिक्षणाची चळवळ बळकट करणाऱ्या आणि तत्कालिन समाजाच्या विरोधात जाऊन स्त्री शिक्षणाला प्राधान्य देणाऱ्या ज्ञानाई सावित्रीमाई फुलेंना विनम्र अभिवादन!

आचार्य नीती

राजकीय, सामाजिक, साहित्यिक आणि अभ्यासपूर्ण माहितीसाठी आचार्य नीती हे सांकेतिकस्थळ सुरु करण्यात आलं आहे. महाराष्ट्रासह देशभरातील विविध घटना,ताज्या घडामोडी यांचे सखोल विश्लेषण तुम्हाला या सांकेतिक स्थळावर वाचायला मिळेल. यामाध्यमातून आम्ही सातत्यापूर्ण आपल्यापर्यंत विश्वासनीय आणि वैचारिक माहिती पोहचवत राहू.आमच्यासोबत जोडले जा आणि अभ्यासपुर्ण माहिती वाचत राहा.
Back to top button

You cannot copy content of this page