नवी मुंबईच्या सत्ताकारणात का आहेत गणेश नाईक महत्त्वाचे,वाचा सविस्तर…

थोडक्यात
  • युनियन लीडर म्हणून गणेश नाईक काम करत असताना शिवसेना पदाधिकाऱ्यांची नजर त्यांच्यावर पडली आणि शिवसेनेकडून नाईकांना बोलावण्यात आलं.यावेळी गणेश नाईकांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांची भेट घेत शिवसेनेत प्रवेश केला आणि शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात उडी मारली.

गणेश नाईक

जसं बीडमध्ये मुंडे आडनावाला आणि बारामतीत पवार आडनावाला राजकिय वजन आहे, तसंच काहीसं वजन नवी मुंबईमध्ये नाईक आडनावाला आहे. कारण,नवी मुंबईचं राजकिय गणित हे गणेश नाईक यांच्या नावाशिवाय पुढेच सरकू शकत नाही. नवी मुंबईतलं सत्ताकारण हे पुर्णत: गणेश नाईकांवर अवलंबून आहे. या सर्वाला कारणीभूत आहे गणेश नाईकांचा आजवरचा इतिहास. हाच इतिहास आणि त्यांची आजवरची इतंभूत माहिती आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

या इतिहासाची सुरूवात होते साधारणत: ८० च्या दशकातून.सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेले गणेश नाईक हे सुरूवातीला पनवेलजवळच्या रिलायन्स कंपनीत काम करत होते. इथेच त्यांना त्यांच्यातलं संघटन कौशल्य समजलं आणि त्यांनी असंघटीत कामगारांना संघटीत करून एक युनियन स्थापन केली.या युनियन लीडर स्वत: गणेश नाईक होते. युनियन लीडर म्हणून संघटनेत काम करत असताना ते आक्रमक कामगार नेता म्हणून उदयास आले आणि इथूनच त्यांचा राजकिय प्रवास सुरू झाला.

युनियन लीडर म्हणून गणेश नाईक काम करत असताना शिवसेना पदाधिकाऱ्यांची नजर त्यांच्यावर पडली आणि शिवसेनेकडून नाईकांना बोलावण्यात आलं.यावेळी गणेश नाईकांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांची भेट घेत शिवसेनेत प्रवेश केला आणि शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात उडी मारली.

१९९० साली गणेश नाईकांना शिवसेनेकडून आमदारकीसाठी पहिल्यांदा उमेदवारी मिळाली. यावेळी ही निवडणूक गणेश नाईकांनी बेलापूर मतदारसंघातून लढवली होती. या निवडणूकीत भरघोस मतांनी आघाडी मिळवत गणेश नाईक पहिल्यांदा आमदार म्हणून विधानसभेत दाखल झाले होते. १९९० साली त्यांना फक्त आमदारकीवर समाधान मानावं लागलं होतं. मात्र,यानंतरच्या पुढील विधानसभा निवडणूकीतही ते विजय झाले आणि त्याचवेळी शिवसेना-भाजप युतीची महाराष्ट्रात सत्ता आली. या काळात गणेश नाईक यांच्याकडे पर्यावरण मंत्रीपद आणि ठाण्याचं पालकमंत्रीपद आलं. मात्र,यावेळी गणेश नाईकांना मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा होती.पण असं झालं नाही युतीचं सरकार येताच शिवसेनेकडे मुख्यमंत्रिपद आलं आणि मनोहर जोशी, नारायण राणे यांना बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केलं.

गणेश नाईक यांना या मुख्यमंत्री पदाची आशा होती. गणेश नाईक स्वत:ला त्या योग्यतेचे समजत होते. मात्र, मुख्यमंत्रीपद नाहीच, पण पर्यावरण मंत्रीपद देऊन त्यांना महत्त्वाच्या मंत्रीपदांपासूनही बाजूला सारलं गेलं म्हणून ते नाराज झाले.

या नाराजीतूनच गणेश नाईकांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करत सेना सोडली आणि शरद पवारांच्या नेतृत्वात काम करत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते दाखल झाले. दरम्यानच्या काळात ठाण्यात शिवसेनेचं प्रतिनिधीत्व आनंद दिघे करत होते. गणेश नाईक यांनी शिवसेना सोडल्यानतंर राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली. त्यांच्यासमोर बेलापुरातून आनंद दिघे यांनी अत्यंत नवख्या असलेल्या सीताराम भोईर यांना उभं केलं आणि या निवडणूकीत गणेश नाईकांना पराभवाला समोरं जावं लागलं.

हा पराभव गणेश नाईकांच्या जिव्हारी लागला.त्यांना हा पराभव सकारत्मकतेने घेत २००४ साली पुन्हा निवडणूक लढवली आणि ते निवडून आले.यानंतरच्या २००९ च्या निवडणूकीतही त्यांचा दुसऱ्यांदा विजय झाला.पण २०१४ साली मंदा म्हात्रेंच्या विरोधात उभ्या राहिलेल्या गणेश नाईकांना पराभवाला सामोरं जावं लागलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधील पहिल्या फळीतल्या नेत्यांपैकी एक असलेल्या गणेश नाईकांचा पराभव झाल्यामुळे या पराभवाची राज्यभर चर्चा झाली होती.

मात्र दुसरीकडे ऐरोली मतदार संघातून गणेश नाईक यांचा सुपुत्र संदिप नाईक हे २०१४ ला आमदारकीला बहुमताने निवडून आले.यानंतर गणेश नाईकांवर घराणेशाहीला वाव दिल्यामुळे टिका होऊ लागली. त्यांनी मोठ्या मुलाला म्हणजेच संजीव नाईक यांना खासदार केलं. पुतण्या सागर नाईक यांना नवी मुंबईचं महापौर केलं.नवी मुंबईतली सत्ता ही नाईक केंद्री केल्यानं त्यांच्यावर चहुबाजुने टिकेचं धनी बनवलं गेलं.मात्र,गणेश नाईकांना विकासाला प्राधान्य देत सत्तेचा वापर करून नवी मुंबईचा अत्याधुनिक पद्धतीने कायापालट करून दाखवला.

यानंतर त्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकी आधी राष्ट्रवादीला राम राम करत भाजपची वाट धरली आणि जवळपास नवी मुंबईतील ४८ तत्कालिन नगरसेवक व ७० माजी नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश केला.यामुळे नवी मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठे खिंडार पडले.यानंतर ऐरोली मतदार संघातून गणेश नाईकांनी भाजपच्या तिकीटावर आमदारकी लढवली आणि त्यांनी विजय संपादित केला.

आज गणेश नाईक नवी मुंबईत जनहिताची कामं मोठ्या प्रमाणात करतायेत.दुसरीकडे राज्यात नव्याने प्रस्तापित झालेल्या युतीच्या सत्तेमुळे मंत्रीपदावर त्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.मात्र,मंत्री मंडळाचा विस्तार लांबणीवर पडल्यामुळे नाईकांना अजुन कितीवेळ प्रतिक्षा करावी लागणारेय याचं उत्तर येणार काळचं देईल.

आचार्य नीती

राजकीय, सामाजिक, साहित्यिक आणि अभ्यासपूर्ण माहितीसाठी आचार्य नीती हे सांकेतिकस्थळ सुरु करण्यात आलं आहे. महाराष्ट्रासह देशभरातील विविध घटना,ताज्या घडामोडी यांचे सखोल विश्लेषण तुम्हाला या सांकेतिक स्थळावर वाचायला मिळेल. यामाध्यमातून आम्ही सातत्यापूर्ण आपल्यापर्यंत विश्वासनीय आणि वैचारिक माहिती पोहचवत राहू.आमच्यासोबत जोडले जा आणि अभ्यासपुर्ण माहिती वाचत राहा.
Back to top button

You cannot copy content of this page