महाराष्ट्रात केसीआर यांचा तेलंगणा पॅटर्न यशस्वी ठरणार का?

थोडक्यात- महाराष्ट्रात शेतकरी हिताचा मुद्दा घेऊन सक्षम पाऊले उचलू पाहणाऱ्या केसीआर यांनी महाराष्ट्रातील वृत्त माध्यमांपासून मोठ-मोठ्या होर्डिंगपर्यंत सर्वंचं बाजूने जाहिरातींचे थेट प्रक्षेपण मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी कंबर कसली आहे. मोदींच्या गुजरात पॅर्टनला टक्कर देत तेलंगणा पॅर्टन कसा यशस्वी ठरतोय हे देखील दाखवण्याचा प्रयत्न सातत्याने महाराष्ट्रात प्रसारित होणाऱ्या जाहिरातींच्या माध्यमातून केला जात आहे.

बीआरएस आणि केसीआर हे दोन शब्द महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ऐकू येऊ लागले आहेत. याचं कारण म्हणजे महाराष्ट्राच्या सीमेमध्ये घोगावत असलेलं गुलाबी वादळं. तेलंगणा राज्यातून बाहेर पडू पाहणाऱ्या के.चंद्रशेखर राव यांनी आपल्या पक्षाचे हात पाय आता महाराष्ट्रातही पसरण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. राज्यातील नावाजलेले नेते हर्षवर्धन जाधव यांना सोबत घेऊन महाराष्ट्रात केसीआर पक्ष आपली संघटना बांधत आहे.अशात केसीआर यांनी नांदेड, बुलढाणा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये पक्षांचे कार्यालय मोठ्या धडाक्यात सुरू करत आपले शक्तीप्रदर्शन देखील दाखवण्यास सुरूवात केली आहे.केसीआर यांच्या सभेला होणारी गर्दी, ते भाषणाच्या माध्यमातून मांडत असलेले मुद्दे यामुळे महाराष्ट्रातील वृत्त माध्यमांचे लक्ष वेधून घेण्यात बीआरएस यशस्वी ठरली आहे.

केसीआर आणि बीआरएस म्हणजे काय रे भाऊ?
‘केसीआर’ हे ‘के.चंद्रशेखर राव’ यांच्या नावाचे शॉर्टफॉर्म आहे.के.चंद्रशेखर राव हे सध्या तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री आहेत व बीआरएस या पक्षाचे संस्थापक व प्रमुख आहेत.याच बीआरएस या नावाचा फुल फॉर्म म्हणजे भारत राष्ट्र समिती हा पक्ष सध्या तेलंगणा राज्यापुरता सिमित आहे.मात्र, आता तो महाराष्ट्रात आपले हात पाय पसरू लागला आहे.

के.चंद्रशेखर राव यांच्याविषयी थोडंसं..
आंध्रप्रदेश या राज्यापासून स्वतंत्र होत २०१४ मध्ये तेलंगणा हे देशातलं २८ वं राज्य म्हणून नावारूपाला आलं. हे राज्य वेगळं व्हावं यासाठी स्थानिक नागरिकांनी मोठा लढा उभारला होता. या लढाचं नेतृत्व काही महत्त्वाचे नेते करत होते. त्यातलंच एक नाव म्हणजे के.चंद्रशेखर राव (केसीआर). सुरूवातीला केसीआर यांनी तेलंगणा राष्ट्र समिती या पक्षाच्या माध्यमातून आपलं संघटन वाढवलं व ते तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री बनले. यानंतर तेलंगणा हे नवं राज्य म्हणून सुस्थितीत आल्यानंतर के.चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी आपल्या पक्षाचं नावं बदललं व आपल्या पक्षाचं नावं भारत राष्ट्र समिती असं केलं.

महापुरूषांच्या माध्यमातून जनसामांन्यांपर्यंत पोहचण्याचा बीआरएसचा प्रयत्न-
महाराष्ट्रातील तमाम जनतेचे प्रेरणास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो सध्या बीआरएसच्या बॅनरवर झळकत आहेत. या माध्यमातून जनसामांन्यांपर्यंत पोहचण्यासाठी बीआरएस बहुजनांना साद घालण्याचा प्रयत्न करत आहेत. यातून महाराष्ट्रात बीआरएसला पाठिंबा मिळत असल्याचं चित्र आहे.

गुजरात पॅर्टनच्या धर्तीवर केसीआर यांचा तेलंगणा पॅटर्न-
महाराष्ट्रात शेतकरी हिताचा मुद्दा घेऊन सक्षम पाऊले उचलू पाहणाऱ्या केसीआर यांनी महाराष्ट्रातील वृत्त माध्यमांपासून मोठ-मोठ्या होर्डिंगपर्यंत सर्वंचं बाजूने जाहिरातींचे थेट प्रक्षेपण मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी कंबर कसली आहे. मोदींच्या गुजरात पॅर्टनला टक्कर देत तेलंगणा पॅर्टन कसा यशस्वी ठरतोय हे देखील दाखवण्याचा प्रयत्न सातत्याने महाराष्ट्रात प्रसारित होणाऱ्या जाहिरातींच्या माध्यमातून केला जात आहे.या जाहिरातींमध्ये तेलंगणातील विकास कामं, महिलांसाठी केसीआर सरकार करत असलेली कामं, केसीआर सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय यांचा समावेश करण्यात आला आहे. सध्या या जाहिरातींच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नागरिकांच्या मनात घर निर्माण करण्याचं काम केसीआर करत आहेत.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पिकाला तेलंगणात मिळत असलेला चांगला भाव
महाराष्ट्रातील शेतकरी पिकाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे राज्य सरकारविरोधात आक्रमक होत असतानाच दुसरीकडे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पिकाला तेलंगणात चांगला भाव उपलब्ध होत असल्याचे व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. हे व्हिडीओ अतिशय बोलके आहेत. हे व्हिडीओ मार्केड यार्डच्या ठिकाणी मोबाईलने शूट केले आहेत. या व्हिडीओत शेतकऱ्यांकडूनच राज्यातील पिकाला मिळत असलेल्या भावाची आणि तेलंगणात पिकाला मिळत असलेल्या भावाची तुलना केली जात आहे. हे देखील केसीआर तंत्रच असल्याचं बोललं जात आहे.

केसीआर आपल्या मंत्रीमंडळासह करणार श्री विठ्ठल दर्शनाने वातावरण निर्मिती
सध्या महाराष्ट्रातील वारकरी लाखोच्या संख्येने पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. अशात केसीआर हे २६ जून आणि २७ जून असे दोन दिवस पंढरपूर दौऱ्यावर आहेत. ते आपल्या मंत्रीमंडळासह श्री विठ्ठलाचे दर्शन घेणार आहेत. दरम्यान ते हॅलिकॉप्टरमधून वारीवर पुष्पवृष्टी करणार होते.मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आता ते विठ्ठलरायाचे दर्शन घेऊन वारकऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. दुसरीकडे याच गोष्टीमुळे महाराष्ट्रातील राजकारण देखील तापले आहे. नुकतंच माध्यमांशी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्यांनी फक्त दर्शन घेण्यासाठी यावं राजकारण करण्यासाठी येऊ नये, अशा शब्दात केसीआर यांच्यावर टिकास्त्र डागलं.याचसोबत कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील माध्यमांशी संवाद साधत, ‘तेलंगणा पॅटर्न फसवा आहे, लवकरच आम्ही त्याची पोलखोल करू. आमच्यासाठी आषाढी वारी आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय आहे, केसीआर यांनी राजकिय फायदा घेऊ नये’,असं मत व्यक्त केलं आहे. दरम्यान केसीआर हे विठ्ठलरायाचे दर्शनाने बीआरएस पक्षासाठी आवश्यक असं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

केसीआर यांनी शोधलेली महाराष्ट्रातील जनतेची नाडी
२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि २०२५ मध्ये होणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकांच्या धर्तीवर केसीआर हे कंबर कसून तयारीला लागले आहेत. या निवडणूकांच्या धर्तीवर महाराष्ट्रात राजकिय वातावरण ढवळून काढण्यासाठी ‘अब कि बार, किसान सरकार’ हा नारा देत बीआरएस पक्ष काम करत आहे. दरम्यान शेतकरी,महिला भगिणी आणि बहुजन समाज कल्याण हे तत्त्ववादी नाडी शोधून केसीआर यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात पाऊले टाकायला सुरूवात केली आहे.मात्र आता केसीआर यांचा तेलंगणा पॅटर्न यशस्वी ठरणार का हे पाहावं लागेल.

समाधान जाधव

कु.समाधान जाधव चालू घडामोडी तसंच विविध विषयांवर आपल्या लेखनीच्या माध्यमातून प्रखरपणे भाष्य करणारे पत्रकार. समाधान यांनी महाराष्ट्रातील नावाजलेल्या वृत्तवाहिनीसोबत प्रदीर्घ काळ काम केले आहे. तसंच महाराष्ट्रभरात विविध विषयांवर जवळपास दिडशेहून अधिक व्याख्याने देखील सांगितली आहेत.
Back to top button

You cannot copy content of this page